परवडणाऱ्या घरांपेक्षा लक्झरी घरांची विक्री अधिक ; देशात वर्षभरात ३ लाख घरांची विक्री
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे शहर वेगाने महानगर होत आहे. मेट्रोसह विविध सोयी-सुविधा वाढत असल्याचे दिसून येत आहे. याचे प्रत्यंतर शहरात राहण्यासाठी घरांची खरेदी करणाऱ्या लोकांवरून येते. २०२४ मध्ये देशभरातील सात महत्त्वाच्या शहरांत ३ लाख २ हजार ८६७ घरांची विक्रमी विक्री झाली. त्यात पुणे शहरात तब्बल ५३ हजार २२३ घरांची विक्री होऊन पुणे देशात चौथ्या क्रमांकावर आले. दिल्ली, मुंबई, बंगळुरूनंतर पुणे आघाडीवर राहिले आहे.
देशातील सात महत्त्वाच्या शहरांमध्ये ३ लाख नवीन घरांचा विक्रमी पुरवठा झाला आहे. मुंबई, बंगळुरू आणि हैदराबाद या तीन शहरांमध्ये मिळून ६० टक्के नवीन घरे विक्रीस उपलब्ध झाली. नियोजित वेळेत नवीन घरांचे बांधकाम पूर्ण होत असल्याने २०२४ मध्ये नवीन घरांच्या पुरवठ्यात ३० टक्क्यांची वार्षिक वाढ नोंदवण्यात आली आहे.
श्रेणीनिहाय घरांच्या विक्रीचा विचार करता, २०२३ पेक्षा २०२४ मध्ये लक्झरी घरांची विक्री वाढल्याचा ट्रेंड दिसून येतो. त्यात १ कोटी रुपये व त्यावरील किंमतीच्या घरांचा वाटा निम्म्याहून अधिक आहे. तसेच ३ ते ५ कोटी रुपये किंमतीच्या घरांच्या विक्रीत ८६ टक्क्यांची वाढ झालेली दिसते. ५ कोटी रुपये आणि त्याहून अधिक किंमतीच्या घरांच्या विक्रीतही ८० टक्के वाढ झाली आहे.
कोरोनानंतर २ किंवा त्याहून अधिक बेडरूम असलेल्या घरांच्या मागणीत सातत्याने वाढ दिसून येत आहे. त्यामुळे महत्त्वाच्या बांधकाम व्यावसायिकांकडून लक्झरी श्रेणीच्या फ्लॅटची प्रामुख्याने उभारणी केली जात आहे.
आयटी क्षेत्रातील संधी आणि व्यवसाय, नोकरीसाठी असलेल्या अनुकूल वातावरणामुळे पुणे आणि बंगळुरू या शहरांमध्ये रेसिडेन्शियल रिअल इस्टेट मोठ्या प्रमाणात विस्तारत आहे. मुंबई एमएमआर परिसरातील विस्तारत्या सार्वजनिक वाहतूक सुविधांमुळे मुंबईलगतच्या शहरांत घरांच्या मागणीत वाढ होत आहे.
मुंबई, पुणे, दिल्ली-एनसीआर, बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, कोलकाता या शहरांतील घरांच्या विक्रीत वार्षिक ११ टक्के वाढ झाल्याचे समोर आले आहे.
पुणे शहरात २०२३ मध्ये ६४ हजार ६१३ नवीन घरे उपलब्ध होती. त्यापैकी ५२ हजार ६०१ घरांची विक्री झाली होती. २०२४ मध्ये ५० हजार ९०७ घरांची उपलब्धता होती, तर प्रत्यक्षात ५३ हजार २२३ घरांची विक्री झाली आहे.
शहरातील जमिनीच्या किंमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे जुन्या अपार्टमेंट, वाडे यांच्या जागी जादा एफएसआय घेऊन टोलेजंगी इमारती उभारल्या जात आहेत. परंतु यातील फ्लॅटच्या किंमती सामान्यांना परवडण्यासारख्या नाहीत.
त्यामुळे बांधकाम व्यावसायिकही त्या जागी लक्झरी फ्लॅट बांधण्यावर भर देत आहेत. परिणामी, सामान्य नागरिकांना नवीन घरासाठी शहराच्या मध्यवस्तीपासून दूर उपनगर किंवा त्याही पुढे जाण्याची वेळ आली आहे.
![घरांच्या विक्रीत देशात पुण्याचा चौथा क्रमांक 2 Feb 2025 7 1](https://maharashtranewsnetwork.com/wp-content/uploads/2025/02/Feb-2025-7-1-679x1024.jpg)