हरविलेल्या २३०० मोबाईलमधून ट्रेस झाले, सहा पथके होती कार्यरत, एका महिन्याची कामगिरी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शहरात हरवलेले, चोरीला गेलेले किंवा गहाळ झालेले मोबाईल परत मिळवण्यासाठी सायबर पोलिसांनी विशेष मोहिम राबवून ४५६ मोबाईल नागरिकांना परत केले. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयातील हिरकणी हॉलमध्ये पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते हा वितरण सोहळा पार पडला.
गेल्या महिन्यात शहरातून एकूण २३०० मोबाईल हरवले किंवा चोरीला गेले होते. त्यापैकी सुरू असलेल्या आणि ट्रेस झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन त्यांना परत मिळवण्यात सायबर पोलिसांना यश आले.
पुणे शहर पोलिसांनी “लॉस्ट अँड फाऊंड” पोर्टल सुरू केले आहे, जिथे नागरिक हरवलेल्या मोबाईलची तक्रार ऑनलाइन नोंदवू शकतात. नागरिकांनी आधार कार्डसह CEIR (Central Equipment Identity Register) पोर्टलवर तक्रार दाखल करावी लागते.
सीईआयआर पोर्टलवर आलेल्या तक्रारींवरून हरवलेल्या मोबाईलच्या IMEI क्रमांकाचे विश्लेषण करून, सध्या सुरू असलेल्या सीमकार्डचा शोध घेतला जातो. ही सर्व माहिती सायबर पोलिसांना पोर्टलद्वारे मिळते, ज्यामुळे मोबाईल शोधणे सोपे होते.
गुन्हे शाखा, संगणक शाखा आणि सायबर पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी CEIR पोर्टलवरील ट्रेस झालेल्या मोबाईलसाठी सहा विशेष पथके तयार केली. या पथकांनी केलेल्या प्रभावी कारवाईत २३०० हरवलेल्या मोबाईल तक्रारींपैकी ४५६ मोबाईल शोधण्यात यश आले.
शिवाजीनगर पोलीस मुख्यालयातील हिरकणी हॉलमध्ये पार पडलेल्या समारंभात पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते नागरिकांना मोबाईल परत करण्यात आले.
या मोहिमेत पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे, राहुल शिंदे, किरण जमदाडे, संदिप कोळगे, प्रमोद टिळेकर, विशाल इथापे, मनोज सांगळे, चेतन चव्हाण, नितीन जगदाळे, राजेंद्र पुणेकर, लटू सूर्यवंशी, समीर पिनाणे, इश्वर आंधळे, सुनयना मोरे, लोकेश्वर चुटके, किरण गायकवाड, सचिन शिंदे, कल्याणी कोळेकर, सुमषा तरंगे, दिनेश मरकड, अमर बनसोडे, आदनान शेख यांचा या मोहिमेत महत्त्वाचा वाटा होता.
सायबर पोलिसांनी मोबाईल हरवल्यास किंवा चोरीला गेल्यास तात्काळ CEIR पोर्टलवर तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे. तसेच शहराबाहेर ट्रेस झालेल्या मोबाईलचा शोध घेण्याची प्रक्रिया सातत्याने सुरू ठेवण्यात येणार आहे.
