स्थानिक व्यापारी व नागरिक घेणार पालकमंत्र्याची भेट
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : बिबवेवाडीतील गंगाधाम चौकातील उड्डाणपुलाच्या दिशाबदलाच्या निर्णयावर स्थानिक नागरिक आणि सामाजिक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मार्केटयार्ड ते आईमाता मंदिर हा अत्यंत वाहतुकीच्या ताणाखालील मार्ग असून, या रस्त्यावर उड्डाणपुलाची नितांत गरज आहे. मात्र, प्रशासनाने अनपेक्षितपणे हा पूल बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर वळवल्याने नागरिक संतप्त झाले आहेत.
स्थानिक नागरिकांनी शनिवारी झालेल्या बैठकीत या निर्णयाविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा दिला. यावेळी अनेकांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हा निर्णय काही बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी घेतल्याचा आरोप केला.
“वाहतुकीचा मोठा भार मार्केटयार्ड-आईमाता मार्गावर आहे. येथे उड्डाणपूल न बांधल्यास भविष्यात अपघात आणि वाहतूक कोंडी अधिकच वाढेल,” असे मत वाहतूक तज्ज्ञांनी व्यक्त केले.
“लोकांच्या गरजा डावलून निर्णय घेणे योग्य नाही.
आम्ही आमच्या हक्कासाठी लढू,” असे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. येत्या आठवड्यात अधिकृत निवेदनाद्वारे प्रशासनाकडे फेरविचार करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
