आवृत्ती पुणे
← Back to Homepage

संगीताच्या सुमधुर आठवणींना उजाळा देणारा प्राईडचा ‘रेट्रो’ स्नेहसंमेलन संपन्न

Spread the love

भूम : जुन्या सुवर्णकाळातील गाण्यांना नव्याने साज चढवणारा आणि संगीतप्रेमींना नॉस्टॅल्जियाचा आनंद देणारा प्राईड इंग्लिश स्कूलचा ‘रेट्रो’ वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

कार्यक्रमाचे उद्घाटन उद्योजक गोरख भोरे आणि सह्याद्री ब्लड बँकेचे शशिकांत करंजकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून झाले. या वेळी अमर सुपेकर आणि फैजान काझी यांची प्रमुख उपस्थिती होती.

या कार्यक्रमात १९६० ते १९९० च्या दशकातील अजरामर हिंदी आणि मराठी गाण्यांवर प्राईडच्या बालकलाकारांनी सुरेल सादरीकरण केले. लावणी, शेतकरी गीत, देशभक्तीपर गीत यांसह विविध गाण्यांवर विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त नृत्य सादर केले.

कार्यक्रमाची सुरुवात हृदयाला भिडणाऱ्या मोहक गाण्यांनी झाली. त्यानंतर श्रोत्यांना स्वप्नील दुनियेत घेऊन जाणाऱ्या विविध युगांतील सदाबहार गाण्यांची लयलूट करण्यात आली. किशोर कुमार, लता मंगेशकर, मोहम्मद रफी, आशा भोसले, साधना सरगम यांच्या अजरामर गाण्यांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.

यावेळी, रंगीत प्रकाशयोजना आणि पारंपरिक वेशभूषेने ‘रेट्रो थीम’ अधिक मोहक बनवली. प्रेक्षकांनी गाण्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. टाळ्यांचा कडकडाट आणि गाण्यांच्या तालावर थिरकणाऱ्या प्रेक्षकांनी कार्यक्रम अधिक रंगतदार केला.

हा अनुभव रसिकांच्या मनात कायमचा कोरला गेला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अलीम सर यांनी केले, तर आभार प्रदर्शन भाग्यश्री डांगे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मेघा सुपेकर, दिपीका टकले, माधुरी गरड, आशा म्हेत्रे, अरुणा बोत्रे, स्वप्नील सुपेकर, अक्षय बाराते, अमित सुपेकर, सरफराज मोगल आदींनी विशेष परिश्रम घेतले.