आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वयोवृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी लांबवणाऱ्या तरुणाला अटक

Spread the love

पुणे : धुणी-भांडी करणाऱ्या वयोवृद्ध महिलेला लिफ्ट देण्याच्या बहाण्याने नदीपात्रातील वीटभट्टीजवळ मारहाण करण्याची धमकी देऊन तिच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने चोरणाऱ्या तरुणाला डेक्कन पोलिसांनी अवघ्या चार तासांत जेरबंद केले.

दत्तवाडी परिसरातील ६५ वर्षीय महिलेकडून डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती. शनिवारी सकाळी ११ वाजता त्या नदीपात्रातून पायी चालत असताना अक्षय अनिरुद्ध ओक (वय २७, रा. गजानन भवन, पेपर गल्ली, गांधी पेपर समोर, शनिवार पेठ) याने त्यांना दुचाकीवर लिफ्ट दिली.

राजपूत वीटभट्टीजवळ पोहोचल्यानंतर त्याने गाडी थांबवली आणि महिलेला मारण्याची धमकी देत खाली पाडले. त्यानंतर त्यांच्या गळ्यातील १ लाख रुपयांची सोनसाखळी हिसकावून तो पळून गेला.

गुन्ह्याची माहिती मिळताच तपास पथकाने घटनास्थळी सीसीटीव्ही फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून आरोपीचे नाव निष्पन्न झाले. त्यानुसार, पोलिसांनी शनिवार पेठेतून अक्षय ओकला ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरलेली १ लाख रुपयांची सोनसाखळी आणि दुचाकी असा एकूण १ लाख २० हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला.

अक्षय ओक हा पदवीधर असून त्याचा लाँड्री व्यवसाय आहे. घरगुती भांडणे आणि आर्थिक अडचणींमुळे त्याने हा गुन्हा केल्याची कबुली त्याने पोलिसांना दिली.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिरीषा निंबाळकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) प्रसाद राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अजय भोसले, दत्तात्रय सावंत, सहायक पोलीस फौजदार दत्तात्रय शिंदे, पोलीस अंमलदार धनश्री सुपेकर, महेश शिरसाठ, सागर घाडगे, वसीम सिद्दीकी, रोहित पाथरुट, रोहित मिरजे आणि नागनाथ म्हस्के यांनी केली.