बार्शी शिवसृष्टीत विद्यार्थ्यांच्या गर्जनेने दुमदुमला शिवरायांचा पराक्रम
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : फिनिक्स पोदार लर्न स्कूल बार्शीच्या विद्यार्थ्यांनी दिलेल्या शिवगर्जनेने संपूर्ण बार्शी शिवमय झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आठवण करून देणाऱ्या या अनोख्या सादरीकरणाने उपस्थितांना इतिहास जिवंत झाल्यासारखा वाटला.
बार्शीमध्ये साकारलेल्या शिवसृष्टीत आणि शिवाजी कॉलेज येथे छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेपुढे विद्यार्थ्यांनी ही शिवगर्जना सादर करून त्यांना अनोखी मानवंदना अर्पण केली. विद्यार्थ्यांच्या जोशपूर्ण सादरीकरणामुळे शिवरायांचा प्रताप, त्यांचे रूप आणि त्यांच्या शौर्यगाथा प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.
त्यांचा आवाज, आत्मविश्वास आणि देशभक्तीची भावना यामुळे संपूर्ण परिसर भारावून गेला. या शिवगर्जनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी स्वयंशिस्त, धाडस, संयम आणि प्रसंगावधान यांसारखे छत्रपती शिवरायांचे गुण साकार केले.
त्यांच्या सादरीकरणाने उपस्थितांना शिवकालीन इतिहासाची अनुभूती मिळाली. या भव्य उपक्रमासाठी संस्थेचे सचिव श्री. संदीप बरडे, प्राचार्य श्री. रविराज बेलोरे आणि संपूर्ण शिक्षकवृंद यांनी विशेष मार्गदर्शन केले.
इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी उभारलेल्या या शिवकालीन वातावरणाने उपस्थितांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. त्यांचे हे सादरीकरण प्रेक्षकांसाठी मंत्रमुग्ध करणारे ठरले. फिनिक्स पोदार लर्न स्कूल बार्शीच्या विद्यार्थ्यांनी बार्शीत शिवरायांचा इतिहास जिवंत केला आणि शिवगर्जनेच्या माध्यमातून त्यांना अनोखी मानवंदना अर्पण केली.
