आयटी इंजिनिअर तरुणाला केली होती मारहाण; कोथरुडमधील घटना
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे: आयटी इंजिनिअरला भरचौकात मारहाण करणाऱ्या गजा मारणे टोळीच्या गुंडांवर कोथरूड पोलिसांनी सुरुवातीला किरकोळ मारहाणीचे कलम लावले होते. मात्र, वरिष्ठ स्तरावरून आदेश मिळाल्यानंतर या गुंडांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. शुक्रवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एच. वानखेडे यांनी २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी मंजूर केली.
ओम तिर्थराम धर्मजिज्ञासू (३५, रा. शिंदे चाळ, शास्त्रीनगर, कोथरूड), किरण कोंडिबा पडवळ (३१, रा. शेख चाळ, शास्त्रीनगर, कोथरूड), अमोल विनायक तापकीर (३५, रा. लालबहादूर शास्त्री कॉलनी, शास्त्रीनगर, कोथरूड) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
हा प्रकार १९ फेब्रुवारी रोजी दुपारी साडेचार वाजता कोथरुडमधील भेलकेनगर चौकात घडला. पोलिसांनी या तिघांना २० फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता अटक केली. त्यांचा चौथा साथीदार बाब्या ऊर्फ श्रीकांत संभाजी पवार हा फरार आहे.
फरार बाब्या पवार याच्याविरुद्ध खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी यांसारखे एकूण ९ गुन्हे कोथरुड, भारती विद्यापीठ, पौड आणि अलंकार पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यापैकी ४ गुन्ह्यांत तो निर्दोष मुक्त झाला आहे.
अमोल तापकीर याच्याविरुद्ध कोथरुड आणि भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, खंडणी, दरोड्याच्या तयारीसह मारामारी असे ६ गुन्हे दाखल आहेत, त्यातील एका गुन्ह्यात त्याची निर्दोष मुक्तता झाली आहे.
किरण पडवळ याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, खंडणी, आर्म्स अॅक्ट अंतर्गत ४ गुन्हे दाखल आहेत. ओम धर्मजिज्ञासू याच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण करून खंडणी मागणे आणि मारामारी असे ४ गुन्हे दाखल असून त्यातील एका गुन्ह्यात तो निर्दोष मुक्त झाला आहे.
या प्रकरणी देवेंद्र पुरुषोत्तम जोग (३३, रा. चिंतामणी सोसायटी, मयूर कॉलनी, कोथरूड) यांनी कोथरुड पोलिसांकडे तक्रार दिली आहे. ते दुचाकीवरून जात असताना रस्त्यावर झालेल्या गर्दीमुळे ते थांबले.
त्यावेळी पांढरा शर्ट घातलेल्या एका व्यक्तीने त्यांना विचारले, “काय रे, गाडी हळू चालवता येत नाही का? धक्का मारू का?” फिर्यादींनी उत्तर दिले, “दादा, मी तुम्हाला धक्का दिला नाही.” एवढे म्हणताच पिवळा शर्ट परिधान केलेल्या दुसऱ्या व्यक्तीने त्यांच्या कानाखाली आणि तोंडावर ठोसा मारला.
त्यामुळे त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव सुरू झाला व ते दुचाकीवरून खाली पडले. यानंतर ३ ते ४ जणांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यांच्यातील एकाने कमरेचा पट्टा काढून मारहाण केली, त्यामुळे त्यांना मुका मार लागला. त्यानंतर आरोपी गुजराथ कॉलनीच्या दिशेने दुचाकीवरून पळून गेले.
पोलिसांनी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांनी न्यायालयाला सांगितले की, आरोपी हे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीमुळे समाजात दहशत आहे. त्यामुळे नागरिक तक्रार देण्यास किंवा साक्षीदार होण्यास पुढे येत नाहीत.
या गुन्ह्याचा सखोल तपास करण्यासाठी आरोपींना पोलीस कोठडी देणे आवश्यक आहे. फिर्यादी यांच्या जिवाला धोका होईल अशा पद्धतीने आरोपींनी जीवघेणा हल्ला केला. हा गुन्हा करण्यासाठी आरोपींना कोणी चिथावणी दिली का? या गुन्ह्यात इतर कोणी सहभागी आहे का? तसेच फरार आरोपी बाब्या पवार याचा शोध घेण्यासाठी अटक आरोपींकडे चौकशी करणे गरजेचे आहे, असे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
दरम्यान, आरोपींच्या वतीने अॅड. विजयसिंह ठोंबरे यांनी युक्तिवाद करताना सांगितले की, सुरुवातीला किरकोळ मारहाणीचा गुन्हा दाखल असताना नंतर जाणीवपूर्वक खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करणे योग्य नाही.
जर असे खोटे गुन्हे दाखल होत असतील, तर आम्ही मुंबई उच्च न्यायालयात दाद मागू. न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर तिघांना २४ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
