कॅम्पातील घटनेत सावकारावर गुन्हा दाखल
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : आईच्या औषधोपचारासाठी पैशांची आवश्यकता असल्याने फिर्यादीने २ लाख २१ हजार रुपये व्याजाने घेतले होते. मात्र, ही रक्कम मुदतीत परत करू न शकल्याने सावकाराने जबरदस्तीने त्यांच्या दोन गाड्या उचलून नेल्या. पैशांवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी लष्कर पोलिसांनी सावकाराविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
सनी ऊर्फ दशरथ श्याम म्हेत्रे (वय ३५, रा. हारकानगर, भवानी पेठ) असे या सावकाराचे नाव आहे. याबाबत न्यू मोदीखाना येथील ३० वर्षीय तरुणाने लष्कर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार ऑगस्ट २०२४ पासून सुरू असून, अद्याप सुरूच आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या आईच्या औषधोपचारासाठी पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे त्यांनी सनी म्हेत्रे याच्याकडून व्याजाने २ लाख २१ हजार रुपये घेतले होते. मात्र, मुदतीत रक्कम परत करू न शकल्याने सनी म्हेत्रे याने फिर्यादी व त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या दोन गाड्या जबरदस्तीने उचलून नेल्या.
गाड्या परत मागितल्यावर त्याने व्याजासह संपूर्ण रक्कम भरल्याशिवाय गाड्या परत देणार नाही, असे सांगून नकार दिला. तसेच, तो वारंवार शिवीगाळ करत असून, पैशांवरून जीवे मारण्याची धमकीही देत आहे. त्यामुळे शेवटी फिर्यादीने पोलिसांकडे धाव घेत फिर्याद नोंदवली.या प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक राहुल घाडगे करीत आहेत.
