वाहतूक व्यवस्थेला अडथळा निर्माण करणाऱ्या बांधकामांवर निष्कासन
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कोरेगाव भीमा आणि डाहुली भागातील वाहतूक व्यवस्थेस अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमणांवर पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पथकाकडून निष्कासनाची कारवाई करण्यात आली. अनधिकृत बांधकामांवर शुक्रवारी पीएमआरडीएच्या अनधिकृत बांधकाम व निर्मूलन विभागाच्या पथकाने कारवाई केली.
अनधिकृत बांधकामे वाढल्याने रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पीएमआरडीएने याची दखल घेतली. शुक्रवारी कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथे रस्त्याच्या दोन्ही बाजूंवरील अतिक्रमण व अनधिकृत बांधकामांवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली.
या कारवाईत सुमारे ३६ पत्राशेड काढण्यात आले, तर काही नागरिकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे हटवली. यासोबतच डाहुली (ता. मावळ) येथे रवींद्र ओसवाल, चेतन शहा आणि विवेकानंद सोनावणे यांच्या एकूण १२,९४७ चौ.फुट क्षेत्रफळातील अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्यात आले.
पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी यापुढे अनधिकृत बांधकाम टाळावे, असे आवाहन केले आहे. ही कारवाई महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे, पोलिस अधीक्षक व दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
सहआयुक्त डॉ. दीप्ती सूर्यवंशी-पाटील, उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार सचिन मस्के, तहसीलदार रवींद्र रांजणे तसेच कनिष्ठ अभियंते व पोलिस कर्मचारी यांनी कारवाईमध्ये सहभाग घेतला.
पीएमआरडीए हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा सर्वेक्षण सुरू असून, अशा बांधकामांवर सातत्याने कारवाई केली जाणार असल्याचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले आहे.
