आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दोन तासांत १५१८ वाहनांवर कारवाई

Spread the love

पुणे : वाहतूक कोंडीच्या बाबतीत पुणे शहर जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे. वाहतूक कोंडीबाबत पुणेकर कायम चर्चा करत असतात. परंतु, वाहतूक नियम तोडण्याच्या बाबतीतही पुणेकर आघाडीवर आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन झाल्यामुळेच अनेक ठिकाणी वाहतूक मंदावते.

पुणे पोलिसांनी सोमवारी सायंकाळी दोन तास नाकाबंदी करून १,५१८ वाहनांवर कारवाई केली. या कारवाईत १३ लाख ६५ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे शहरातील महत्त्वाचे रस्ते, चौक, आणि रहदारीच्या ठिकाणी एकूण ७८ ठिकाणी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत नाकाबंदी करण्यात आली.

या कारवाईसाठी पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील ४ अपर पोलीस आयुक्त, ५ पोलीस उपायुक्त, १० विभागीय पोलीस आयुक्त, ३९ वरिष्ठ पोलीस निरीक्षक/निरीक्षक, तपास पथकातील अधिकारी, वाहतूक शाखा, गुन्हे शाखेतील एकूण ९७ पोलीस अधिकारी व १,८७२ पोलीस अंमलदार सहभागी झाले होते.

सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी स्वतः रस्त्यावर उतरून नाकाबंदीची पाहणी केली. या दोन तासांच्या नाकाबंदीत एकूण ४,१८७ वाहने तपासण्यात आली. रॉंग साइड ड्रायव्हिंग, ट्रिपल सीट, सीट बेल्ट न वापरणे अशा वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १,५१८ वाहनांवर कारवाई करण्यात आली.

त्यांच्याकडून १३ लाख ६५ हजार १०० रुपये दंड वसूल करण्यात आला. तसेच, नाकाबंदी दरम्यान एकूण ३७१ वाहने जप्त करण्यात आली. वाहतूक नियमांचे पालन करून वाहतूक शिस्त पाळावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अपर पोलीस आयुक्त, परिमंडळीय पोलीस उपायुक्त, विभागीय सहायक पोलीस आयुक्त, सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी, अंमलदार तसेच गुन्हे शाखा व वाहतूक शाखेने संयुक्तपणे केली.