मुख्य चौक व कोंढवा रस्त्याच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : कात्रज मुख्य चौकामध्ये वाहतुकीस अडथळा ठरत असलेल्या ६० मीटर डी.पी. रस्त्याच्या बाधित मिळकतीचे भूसंपादन कायद्याने ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात आली.
तब्बल २८ वर्षांपासून प्रलंबित असलेली जागा ताब्यात आल्याने कात्रज मुख्य चौक व कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. मात्र, या रस्त्याच्या भूसंपादनाअभावी झालेल्या वाहतूक कोंडी व अपघातांमध्ये अनेक निष्पापांना जीव गमवावा लागल्याने ‘देर आये, दुरुस्त आये’ अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे. कात्रज चौकातील जागा हस्तांतरणासाठी रोख मोबदल्याच्या मागणीसाठी संजय रमेश गुगळे आणि अंकित मदनराज साखरिया यांनी न्यायालयात धाव घेतली होती. गुगळे यांनी मोबदला स्वीकारून हा प्लॉट राज्य शासनाकडे सुपूर्द केला. त्यानंतर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी ही जागा पुणे महानगरपालिकेकडे आज हस्तांतरित केली.
कात्रज येथील स.नं. १/२ ब (पैकी) येथील ६० मीटर डी.पी. रस्त्याने बाधित ३९ गुंठे मिळकतीचे रोख मोबदला २१ कोटी रुपये देऊन भूसंपादन कायद्याने ताब्यात घेण्याची कार्यवाही आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले आणि अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज पी.बी. यांच्या मार्गदर्शनाखाली भूसंपादन व व्यवस्थापन विभागाच्या उपायुक्त प्रतिभा पाटील यांनी केली.
यावेळी माजी नगरसेवक प्रकाश कदम, माजी नगरसेवक वसंत मोरे, स्वराज बाबर, उपअभियंता दिंबर बांगर, शाखा अभियंता रुपाली ढगे, आरेखक संतोष शिंदे तसेच विशेष भूसंपादन अधिकारी क्र. १६ हर्षद घुले आणि अजिंक्य पाटील उपस्थित होते.
“कात्रज चौकातील ६० मीटर रस्त्यात बाधित होणारी ३९ गुंठे जागा ताब्यात घेण्यासाठी तत्कालीन अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांनी सुरुवात केली होती. विशेष भूसंपादन अधिकारी -१६ व महापालिकेच्या भूसंपादन विभागाने गेल्या वर्षभरापासून पाठपुरावा करून प्रत्यक्ष जागा ताब्यात घेतली. मुख्य चौक व कात्रज-कोंढवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लागेल.”
प्रतिभा पाटील, उपायुक्त, भूसंपादन विभाग, मनपा
