मोका लावल्याने कोथरुडचा गुन्हा क्राईम ब्रँचकडे हस्तांतरित
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : गजा मारणे आणि रुपेश मारणे या दोघांनी आपल्या साथीदारांना ‘‘मस्ती आली आहे, साल्याला मारा,’’ असे म्हणून चिथावणी दिली असल्याचा दावा पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात केला.
आयटी इंजिनियरला मारहाण करून खून करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात पुणे पोलिसांनी कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह त्याच्या साथीदारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली. विशेष न्यायालयाने गजा मारणे याला ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.
गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांच्याकडे या गुन्ह्याचा तपास सोपवण्यात आला आहे. कोथरुड पोलीस ठाण्यात सोमवारी सायंकाळी गजा मारणे हजर झाल्यानंतर कोथरुड पोलिसांनी त्याला रात्री अटक केली. त्यानंतर मंगळवारी दुपारी न्यायालयात हजर केले.
पोलिसांनी न्यायालयात सांगितले की, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील यांनी या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याचा (मोक्का) अंतर्भाव करण्यास मान्यता दिली आहे. गजानन मारणे याचा गुन्ह्यातील सहभाग निष्पन्न झाल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.
आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या साथीदारांनी फिर्यादीस भर चौकात, सार्वजनिक ठिकाणी, जीव ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण करून जखमी केले आहे. या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्याच्या मागे नक्की कारण काय आहे, हे शोधण्यासाठी आरोपीकडे चौकशी आवश्यक आहे.
तसेच, गुन्ह्यातील इतर फरार आरोपींच्या ठिकाणाची माहिती घेऊन त्यांना अटक करण्याची गरज आहे. आरोपीच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण सुरू असून तपासादरम्यान उपलब्ध होणाऱ्या माहितीच्या आधारे या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे, याबाबत चौकशी केली जाणार आहे.
आतापर्यंत या गुन्ह्यात दोन अॅक्टिव्हा दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.आरोपींनी गुन्ह्यात वापरलेली चारचाकी वाहने व इतर दुचाकी जप्त करायच्या आहेत. गजा मारणे आणि रुपेश मारणे यांनी फिर्यादीस मारहाण करणाऱ्या आरोपींना ‘‘मस्ती आली आहे, साल्याला मारा,’’ असे म्हणून चिथावणी दिली आहे.
फिर्यादी आणि गजा मारणे यांच्यात पूर्वीचे कोणतेही वैमनस्य होते का, याचाही तपास केला जाणार आहे. गजा मारणे हा टोळीचा म्होरक्या असून इतर आरोपी संघटित गुन्हेगारी करणारे सदस्य आहेत. त्यांच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत आणि जनमानसात त्यांची दहशत आहे.
त्यामुळे अटक आरोपी हे इतर फरार आरोपींची माहिती देत नाहीत आणि तपासास सहकार्य करत नाहीत. या आरोपींनी संघटित गुन्हेगारी करून बेकायदेशीर मार्गाने स्थावर अथवा जंगम मालमत्ता मिळवली आहे का, याचाही तपास केला जाणार आहे.
गुन्ह्याच्या घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून इतर सहभागी आरोपींची नावे निष्पन्न करायची आहेत. त्यामुळे १४ दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक पोलीस आयुक्त गणेश इंगळे यांनी केली.
आरोपीचे वकील विजयसिंह ठोंबरे यांनी या मागणीला विरोध करताना सांगितले की, या मारामारीशी आरोपी गजानन मारणे याचा काहीही संबंध नाही. दबावामुळे पोलिसांनी सहा दिवसांनंतर त्याच्या नावाचा गुन्ह्यात समावेश केला आहे. न्यायालयाने सुनावणी घेत गजा मारणे याला ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली.
