बंडगार्डन पोलिसांनी केली आरोपींची धरपकड
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : राजस्थानमध्ये पतीचा खून करून त्याची पत्नी आणि तिचा मित्र पुण्यात पळून आले होते. याची माहिती मिळाल्यावर बंडगार्डन पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले.
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुखीदेवी कमलेश मेवाड (वय ३०, रा. पावटा का चौक, सोजत सिटी, जि. पाली, ता. सोजत, राजस्थान) आणि आशोक काळुराम राठोड (वय २५, रा. बघेला पाल, सिनेमा रोड, सोजत सिटी, ता. सोजत, जि. पाली, राजस्थान) अशी आहेत. खून झालेल्याचे नाव कमलेश जेठाराम मेवाड (वय ३२) आहे.
कमलेश मेवाड हा बेपत्ता असल्याने त्यांचे वडील जेठाराम मेवाड यांनी सोजत सिटी पोलिस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली होती. २० फेब्रुवारी रोजी एका शेतातील खड्ड्यात कमलेश मेवाड यांचा खून करून मृतदेह पुरून ठेवण्यात आल्याचे उघडकीस आले.
त्यानंतर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. कमलेशची पत्नी सुखीदेवी तिचा मित्र आशोक राठोडसोबत पुण्यात पळून आल्याची माहिती मिळाली. ते पुणे रेल्वे स्टेशन परिसरात असल्याचे समजले. बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या तपास पथकातील अधिकारी स्वप्नील लोहार, पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर बडे, ज्ञानेश्वर गायकवाड यांनी आरोपींच्या वर्णनावरून शोध सुरू केला.
पुणे स्टेशनजवळील जयप्रकाश गार्डनमध्ये एका रिक्षाच्या आडोशाला ते लपले असल्याचे आढळून आले. पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी त्यांना सोजत सिटी पोलिसांच्या ताब्यात देण्यात येणार आहे.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त दीपक निकम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील लोहार, प्रदीप शितोळे, सारस साळवी, ज्ञानेश्वर बडे, आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांच्या पथकाने पार पाडली.
