साई इंडस मार्केटिंगचा संचालक भालचंद्र अष्टेकर पाच महिने होता फरार
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करून अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून नागरिकांना गुंतवणूक करण्यास प्रवृत्त करणाऱ्या आणि नंतर फरार झालेल्या साई इंडस मार्केटिंग व श्री मल्टी सर्व्हिसेस कंपनीच्या संचालकाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे.
अटक झालेल्या व्यक्तीचे नाव भालचंद्र महादेव अष्टेकर (रा. श्वेता कुंज अपार्टमेंट, वडगाव बुद्रुक) असे आहे. आरोपीने नागरिकांना तीन वेगवेगळ्या योजनांमध्ये गुंतवणूक करण्यास सांगून मासिक ४ टक्के व्याज देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला काही महिने व्याज दिल्यानंतर तो अचानक गाशा गुंडाळून फरार झाला.
प्राथमिक फिर्यादीनुसार, १२१ गुंतवणूकदारांची सुमारे ९ कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे आढळले. मात्र, प्रत्यक्षात सुमारे १,००० गुंतवणूकदारांची फसवणूक झाली असून रक्कम १५० कोटी रुपयांपर्यंत पोहोचते, असे फसवणूकग्रस्तांचे म्हणणे आहे.
या प्रकरणी विजयकुमार मुरलीधर घाटे (वय ५३, रा. शिवणे) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या व्यावसायिक मित्राने साई इंडस मार्केटिंग व श्री मल्टी सर्व्हिसेसमध्ये चांगला परतावा मिळतो, अशी माहिती दिली. त्यानुसार, त्यांनी सुरुवातीला २ लाख रुपये गुंतवले. त्यावर त्यांना ३ महिन्यांपर्यंत दरमहा ४,००० रुपये व्याज मिळाले. त्यानंतर त्यांनी मुलाच्या आणि पत्नीच्या नावावर आणखी गुंतवणूक केली.
भालचंद्र अष्टेकर याने गुंतवणूकदारांना त्यांच्या मूळ रकमेचे पोस्टडेटेड चेक दिले होते. १० ऑक्टोबर २०२३ रोजी त्याने गुंतवणूकदारांसाठी मेळावा आयोजित केला होता, जिथे मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. मात्र, डिसेंबर २०२३ पासून परतावा देणे थांबवण्यात आले.
गुंतवणूकदारांनी कार्यालयात चौकशी केल्यावर “तुमचे पैसे बुडणार नाहीत, कंपनीचे पैसे अडकले आहेत, लवकरच मिळतील” असे सांगण्यात आले. एप्रिल २०२४ मध्ये झूम मिटिंगद्वारे अष्टेकरने आश्वासन दिले की, लवकरच पैसे मिळतील आणि पोलिसांकडे जाऊ नका, कारण तक्रार केल्यास कोणालाच पैसे मिळणार नाहीत.
यानंतर, मे २०२४ मध्ये कंपनीची वेबसाइट बंद झाली, आणि अष्टेकरने कार्यालय बंद करून फरार झाला. गुंतवणूकदारांनी चौकशी केली असता १२१ लोकांची ९ कोटी २ लाख ७३ हजार ८०० रुपयांची फसवणूक झाल्याचे निष्पन्न झाले.
त्यामुळे त्यांनी आर्थिक गुन्हे शाखेत फिर्याद दाखल केली. ६ सप्टेंबर २०२४ रोजी या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक दीपाली भुजबळ करत आहेत.