आवृत्ती पुणे
← Back to Homepage

महाशिवरात्रीनिमित्त बार्शी येथे सिद्धिविनायक गणेश मंडळाचा सामाजिक उपक्रम

Spread the love

बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : येथील तीन कंदील चौक सिद्धिविनायक गणेश मंडळ यांच्यातर्फे सालाबादप्रमाणे याही वर्षी महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

यावेळी सकाळी २०० किलो साबुदाणा खिचडीचे मोफत वाटप करण्यात आले, तर संध्याकाळी २०० लिटर मसाला दूध भक्तगणांना प्रसादरूपाने देण्यात आले. महाशिवरात्रीच्या निमित्ताने भाविकांसाठी हा उपक्रम मंडळाकडून सातत्याने राबवला जातो.

कार्यक्रमास माजी मंत्री व बार्शीचे आमदार ॲड. दिलीप सोपल यांनी सदिच्छा भेट देऊन महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, त्यांनी उपस्थित भक्तगणांमध्ये मसाला दूधाचे वाटप केले. यावेळी आमदार सोपल यांनी मंडळातील युवकांच्या सेवा भावनेचे आणि सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले आणि त्यांना यापुढेही असे उपक्रम सातत्याने राबवण्याचा सल्ला दिला.

कार्यक्रमाची सुरुवात मंडळातील प्रमुख सदस्यांच्या हस्ते करण्यात आली. महाशिवरात्रीच्या औचित्याने समाजसेवेचा भाग म्हणून तीन वेगवेगळ्या मूकबधिर शाळांमधील विद्यार्थ्यांनाही खिचडीचे वाटप करण्यात आले.

या उपक्रमामुळे महाशिवरात्रीच्या मंगलमय सोहळ्यात समाजातील सर्व स्तरांतील नागरिकांचा सहभाग वाढला. सिद्धिविनायक गणेश मंडळ गेली १२ वर्षांपासून हा सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या राबवत आहे.

या कार्यात मंडळाचे अध्यक्ष आकाश उर्फ बबन नायकोजी आणि सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले. महाशिवरात्रीच्या निमित्ताने सेवा आणि भक्ती यांचा संगम साधणारा हा उपक्रम भाविकांनी मोठ्या उत्साहात अनुभवला.