शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे लक्ष्मीकांत खाबिया यांची मागणी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : राज्यातील सर्व विमानतळावर हिंदी, इंग्रजी भाषेतून उद्घोषणा केली जाते. त्याचबरोबर स्थानिक भाषा म्हणून मराठी भाषेतूनही उद्घोषणा होण्याची आवश्यकता असून मराठीतून ही उद्घोषणा करण्याची सक्ती करावी, अशी मागणी भाषा दिनानिमित्त शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया यांनी केली आहे.
आपल्या या मागणीचे निवेदन खाबिया यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, केंद्रीय नागरी विमानवाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे देऊन केली आहे.
देशातील प्रत्येक राज्याचा विचार केला तर त्या त्या राज्यातील मातृभाषेला प्रथम दर्जा दिला जात आहे. शासकीय कामकाजाबरोबच सर्व व्यवहारांमध्ये स्थानिक भाषांना प्राधान्य दिले जात आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांचा वारसा सांगत असताना महाराष्ट्रातच मराठी भाषेला दुय्यम स्थान का देण्यात येत आहे, हा प्रश्न अनाकलनीय आहे.
पुण्यासह महाराष्ट्रातील विमानतळांवरून बहुभाषीक प्रवासी ये-जा करीत असल्याने इतर भाषा वापरू नका असा मुळीच अट्टहास नाही. मात्र महाराष्ट्रात मराठी भाषला प्राधान्य द्यावे, अशी आग्रही विनंतीवजा मागणी आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर उद्घोषणा मराठी भाषेतून करण्याची सक्ती करावी. कोणतीही भाषा ही सतत ऐकून किंवा बोलूनच अवगत होत असते. प्रत्येक जण आकाशवाणी, दूरचित्रवाहिन्या, वृत्तपत्र अशा विविध माध्यमांशी जोडलेला आहे.
महाराष्ट्रातील स्थानिक दूरचित्रवाहिन्या, आकाशवाणीच्या माध्यमातून देखील मराठी भाषेचा मोठ्या प्रमाणावर प्रचार आणि प्रसार होऊ शकतो. विविध भारतीसारख्या आकाशवाणी वाहिनीवर दिवसभरातून किमान दोन तास तरी मराठी भाषेतून माहिती दिली जाते किंवा संवाद साधला जातो तसेच श्रोत्यांना मराठी गाणी ऐकवली जातात.
असे कार्यक्रम आकाशवाणीच्या सर्व वाहिन्यांवरुन प्रसारित व्हावेत, राज्यातील सर्व विमानतळांवरूनही मराठी भाषेतून उद्घोषणा व्हावी, अशी मागणी शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे करण्यात आली आहे.
अनेक राज्यांमध्ये स्थानिक भाषा दैनंदिन व्यवहारात वापरली जाते. त्याचप्रमाणे शिक्षणाचे माध्यमही स्थानिक भाषाच आहे. शासकीय कामकाजात तसेच दैनंदिन व्यवहारामध्ये मराठी भाषेचा अवलंब होणे आवश्यक आहे.
सीबीएस, आयसीएसी या केंद्रीय स्तरावरील शैक्षणिक संस्था आहेत आणि त्या संस्थांमध्ये मराष्ट्रातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशा शैक्षणिक संस्थांमध्ये मराठी भाषेचा अवलंब केला जावा, असे या निवेदनात म्हटले आहे.
