तब्बल ६६०० कोटी रुपयांचा बिटकॉइन घोटाळा : सीबीआयचे पुण्यासह ६० ठिकाणी छापे
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : तब्बल ६६०० कोटी रुपयांच्या बिटकॉइन घोटाळा प्रकरणात सीबीआयने पुणे, नांदेड, कोल्हापूरसह देशभरात ६० ठिकाणी एकाच वेळी छापे घातले. यात आतापर्यंत २३ कोटी रुपयांची नवी क्रिप्टोकरन्सी जप्त करण्यात आली आहे. सर्वप्रथम पुणे पोलिसांनी या बिटकॉइन घोटाळ्याचा शोध घेतला होता. त्यात पुणे पोलिसांनी अजय व अमित भारद्वाज यांना दुबईहून भारतात आणून अटक केली होती.
अमित भारद्वाज (आता हयात नाही), अजय भारद्वाज, विवेक भारद्वाज, सिम्पी भारद्वाज आणि महेंद्र भारद्वाज यांनी २०१५ मध्ये ‘व्हेरिएबल टेक प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी स्थापन केली होती.
त्यांनी २०१७ मध्ये ‘गेन बिटकॉइन’ या क्रिप्टोकरन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास दर महिन्याला १० टक्के परताव्याचे आमिष दाखवले होते. हजारो गुंतवणूकदार त्याला बळी पडले आणि त्यांनी कंपनीच्या योजनांमध्ये गुंतवणूक केली
कंपनीने सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना परतावाही दिला होता. मात्र, काही काळानंतर कंपनीने परतावा देणे बंद केले. कंपनीच्या संचालकांनी देशभरातून गोळा झालेले ६६०६ कोटी रुपये विविध मार्गांनी स्वतःच्या खात्यात वळवले.
सीबीआयने पुण्यात काही ठिकाणी छापे घातले. ई-मेल, क्लाऊडमधील पुरावे देखील जप्त करण्यात आले. या ६० ठिकाणी झालेल्या छाप्यांमध्ये २३ कोटी ९४ लाख रुपयांच्या क्रिप्टोकरन्सीची जप्ती करण्यात आली आहे.
त्याचबरोबर आर्थिक व्यवहारांची १२१ कागदपत्रे, ३४ लॅपटॉप, हार्ड डिस्क, १२ मोबाईल तसेच कंपनीच्या संचालकांमधील ई-मेलद्वारे झालेला संवाद जप्त करण्यात आला आहे.
सीबीआय सध्या जप्त केलेल्या कागदपत्रे आणि ई-मेलची तपासणी करत आहे.
हा घोटाळा नेमका कसा झाला? त्यातील पैशांची फिरवाफिरवी कशी आणि कुठे झाली? तसेच परदेशात या पैशांद्वारे किती व्यवहार झाले? या सर्व बाबींचा तपास सीबीआय करत आहे.
सीबीआयसोबत ईडीही या प्रकरणाचा तपास करत आहे. आतापर्यंत कंपनीच्या मालकीची देशातील आणि परदेशातील १७२ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यात दुबईतील व्यावसायिक संकुलातील जागेचा समावेश आहे.
गेल्या वर्षी कंपनीच्या मालकीच्या तीन आलिशान मर्सिडीज आणि एक ऑडी गाडीही जप्त करण्यात आली होती. दुबईप्रमाणेच सिंगापूर आणि हाँगकाँगमध्येही कंपनीने या घोटाळ्यातील पैशांमधून मालमत्ता खरेदी केल्याचे निष्पन्न झाले आहे.
