आवृत्ती पुणे
← Back to Homepage

वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पीएमआरडीएचा पुढाकार

Spread the love

पुणे : पुणे शहराभोवती दिवसेंदिवस वाहतूक कोंडी वाढत असल्याने नागरिकांसह वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. २७) पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यालयात विविध यंत्रणांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

या बैठकीत पुणे शहराभोवती असलेल्या राष्ट्रीय महामार्गांवर आणि राज्यमार्गांवर होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत विविध विभागांनी आपली मते नोंदविली. त्यानुसार, या संयुक्त बैठकीत ठरल्याप्रमाणे, वाहतूक कोंडी होणाऱ्या विविध भागांमध्ये पुढील ३० दिवसांत राष्ट्रीय महामार्ग व राज्यमार्गाच्या दोन्ही बाजूंना असलेली अनधिकृत व अतिक्रमित दुकाने, गाळे, बांधकामे आणि इतर तात्पुरती बांधकामे हटवण्यासाठी सर्व विभागांनी संयुक्तपणे कारवाई करण्याचे निश्चित करण्यात आले.

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे महानगरपालिका आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सर्व विभाग संयुक्त कारवाई करणार असून त्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

संबंधित क्षेत्रांतील महामार्ग व राज्यमार्गांलगत असलेली दुकाने, पत्राशेड, गाळे, टपऱ्या आणि अनधिकृत बांधकामे स्वतःहून काढून टाकण्याचे आवाहन स्थानिकांना करण्यात येत आहे. पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीलगत होणाऱ्या संभाव्य अतिक्रमणांना आळा घालण्यासाठी यापुढे दरवर्षी दोन वेळा अतिक्रमण निष्कासन कारवाई करण्याचे नियोजन आहे.

त्यामुळे नागरिकांनी आणि बांधकामधारकांनी परवानगी घेऊनच बांधकामे करावीत, असे आवाहन डॉ. योगेश म्हसे यांनी केले आहे. या बैठकीस अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे शहर मनोज पाटील, सहआयुक्त दीप्ती सूर्यवंशी-पाटील, अधीक्षक भूमी अभिलेख आशा जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक संजय कदम, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे शहर अभियंता मकरंद निकम, वाहतूक विभागाचे उपआयुक्त बापू बांगर, पुणे शहर सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वाघ्याणी, पोलीस निरीक्षक महेशकुमार सरतापे, शंकर पाटील, मीनल पाटील, संतोष जाधव, बी. के. गायकवाड, पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सहशहर अभियंता हरीयाल नरेश, एमआयडीसीचे उपअभियंता प्रकाश पवार, पुणे महानगरपालिकेचे उपअभियंता महेश पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कल्पेश लहिवाल, एमआयडीसीचे एम. एस. भिंगारदिवे, संभाजी लाखे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.