आवृत्ती पुणे
← Back to Homepage

पोलिस असल्याची बतावणी करून लुबाडले

Spread the love

पुणे : मसाज करण्यासाठी घरी येऊन पोलीस असल्याची बतावणी करुन गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन मसाज करणार्‍या तरुणाला एटीएममधून पैसे काढायला लावून लुबाडले. ही घटना पर्वती पायथा येथे २५ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड ते रात्री नऊ वाजेच्या दरम्यान घडली.

याबाबत एका २७ वर्षाच्या तरुणाने स्वारगेट पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यावरुन समीर बेगमपूर असे नाव सांगणाऱ्या भामट्याविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे मसाज थेरेपीस्ट म्हणून काम करतात.

लोकांच्या घरी जाऊन किंवा हॉटेलवर मसाज देत असतात. त्यांनी ग्राहक मिळण्याकरीता वाल्ला या गे डेटिंग अ‍ॅपचा वापर करीत असतात. त्यांना एका मोबाईल क्रमांकावरुन २५ फेब्रुवारी रोजी दुपारी मेसेज आला.

त्यांनी ग्राहक असल्याचे समजून त्याला माहिती दिली. त्याने सायंकाळी ६ वाजता फोन करुन भेटायचे ठरविले. त्यानंतर समीर बेगमपूरे हा रोडवर भेटला़ ठरल्याप्रमाणे ते घरी आले. तेव्हा त्याने तो पोलीस असल्याचे सांगून हाताने मारहाण केली.

त्यावेळी त्याने गुन्हा दाखल करायचा नसेल तर २५ हजार रुपयांची मागणी केली. त्यानंतर त्याच्या गाडीवर बसवून ते लक्ष्मी नारायण टॉकिजच्या समोरील कोटक महिंद्रा बँकेच्या एटीएममध्ये गेले.

त्यांनी २५ हजार रुपये काढले. त्यानंतर त्याने सारस बाग येथील खाऊ गल्लीत जेवायला नेले. त्यांना घरी सोडताना त्याने त्यांच्याकडील २५ हजार रुपये जबरदस्तीने घेऊन तो निघून गेला. पोलीस उपनिरीक्षक कोतकर तपास करीत आहेत.