आवृत्ती पुणे
← Back to Homepage

तरुणीवर अत्याचार करणारा नराधम गजाआड

Spread the love

पुणे : स्वारगेट बस स्थानकात २६ वर्षाच्या तरुणीवर शिवशाही बसमध्ये बलात्कार करणार्‍या दत्तात्रय रामदास गाडे (वय ३५, रा. गुनाट, ता. शिरुर) घटनेनंतर तब्बल ७० तासांनंतर पकडण्यात पुणे पोलिसांना यश आले. मंगळवारी घडलेल्या या घटनेने संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला. या घटनेने एस टी बसस्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. राज्यभरातील एस टी बसस्थानकावरील सुरक्षा व्यवस्थेचा पूर्नविचार करण्यात येणार आहे.

स्वारगेट येथून फलटणला गावी जाण्यासाठी एक २६ वर्षाची तरुणी एस टी बसस्थानकावर मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता आली. या तरुणीला दत्तात्रय गाडे याने फलटणची गाडी तिकडे लागली आहे, असे सांगून एका शिवशाही बसमध्ये जाणार्‍या सांगितले.

ही तरुणी बसमध्ये गेल्यानंतर तिच्या मागोमाग बसमध्ये चढून त्याने दरवाजाची कडी लावली आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर तो पळून गेला. ही तरुणी फलटणला जात असताना वाटेत तिने आपल्या मित्राला फोन करुन माहिती दिली. त्याने पोलिसांकडे तक्रार कर, असे सांगितल्यावर ती परत पुण्यात आली व तिने स्वारगेट पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली होती.

गेल्या मंगळवारी पहाटे साडेपाच वाजता तरुणीवर अत्याचार केल्यानंतर दत्तात्रय गाडे हा थेट गावी आला होता. दिवसभर घरात थांबल्यावर रात्री कार्ल्याच्या किर्तनात हजेरी लावली. बुधवारी त्याच्या या नीच कृत्याची बातमी टीव्हीवरुन सर्वत्र सांगितली जाऊ लागली, तेव्हा तो घरातून पळून गेला होता.

त्यानंतर दिवसभर तो लपून बसला होता. रात्री गावातील एका घरात पाणी मागण्यासाठी तो गेला होता. तेथील महिलेने तो आल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यामुळे गुरुवारी पुणे पोलीस दलातील जवळपास १५० पोलिसांचा फौजफाटा गुनाट गावी दाखल झाला होता. त्यांनी गावातील ऊसाच्या शेतात त्याचा शोध घेतला.

त्यासाठी ड्रोन कॅमेराचा वापर करण्यात आला. परंतु, सायंकाळ झाली तरी तो सापडू शकला नव्हता. रात्र झाल्याने व शेतात बिबट्याचा धोका असल्याने ही शोध मोहिम थांबविण्यात आली होती. तरीही पोलीस गावात मुक्काम ठोकून होते. रात्री तो लपून बसलेल्या ठिकाणाहून बाहेर येईल, असा पोलिसांना संशय होता. त्याप्रमाणे गावातील कॅनॉल रोडला तो गुन्हे शाखेच्या पथकाला सापडला. पोलिसांनी तो दिसताच त्याच्यावर झडप घालून पकडले.

दत्तात्रय गाडे याला पकडण्यासाठी सुमारे ५०० पोलीस अधिकारी, कर्मचारी गेले दोन दिवस कार्यरत होते़. तो गुनाट गावात असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी तेथून बाहेर पडण्याच्या सर्व वाटांवर नाकाबंदी केली होती. त्यामुळे गाडे याच्या बाहेर पडण्याच्या सर्व जागा बंद झाल्या होत्या. रात्री तो लपलेल्या जागेवरुन बाहेर येताच पोलिसांनी पकडले.