मराठी शिकवणाऱ्या शिक्षिकांचा ‘शब्दसारथी’तर्फे विशेष सन्मान
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे – मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला असताना या मराठीचे रक्षण आणि संवर्धन करण्याचे काम करणाऱ्या मराठी विषयाच्या शिक्षिकांना ‘मराठीचे खरे शिलेदार’ म्हणून सन्मानित करण्यात आले. अनंत अडचणींतून वाट काढत टिकून राहिलेल्या आणि गुणवत्ता राखलेल्या मराठी शाळांना या वेळी मानवंदना देण्यात आली.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘शब्दसारथी’च्या वतीने विशेष गौरव समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी, नव्या पिढीचे दमदार लेखक नितीन थोरात प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
ज्येष्ठ साहित्यिक डाॅ. मनिषा पोतदार आणि शब्दसारथीचे संचालक पराग पोतदार व्यासपीठावर उपस्थित होते. ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या मराठी विषयीच्या शिक्षिका अश्विनी जोशी, जयश्री काटीकर, गोळवलकर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका अपर्णा साने आणि शिक्षिका माधुरीताई बापट, डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या शिक्षिका कांचन सोलापूरकर, चिंतामणी ज्ञानपीठातील मराठी शाळेच्या शिक्षिका मीनाक्षी ज्योतिक, प्रियदर्शनी शाळेच्या मराठी भाषेच्या शिक्षिका नीता बाबर यांना यावेळी मानाचा मुजरा करण्यात आला आणि सन्मानपत्र, शाल देऊन गौरवण्यात आले.
शब्दसारथीच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘ऐक, एक गोष्ट सांगतो’ या राज्यस्तरीय कथाकथन स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला. यावेळी अभय कुलकर्णी म्हणाले, विद्यार्थ्यांचे कौतुक आणि शिक्षकांचा गौरव करण्याची ‘शब्दसारथी’ची कल्पना उत्तम आहे.
अशा स्पर्धांना मिळणारा प्रतिसाद आणि पालकांचा उत्साहदेखील वाखाणण्याजोगा आहे. नितीन थोरात म्हणाले, गोष्ट सांगण्याची ऊर्मी प्रत्येकामध्ये असते. आपण आपल्यातील लहान मूल कायम जिवंत ठेवायला हवे.
त्यासाठी सगळ्या मुलांनी आपल्या पालकांसमवेत बसून गोष्ट फुलवण्याचा खेळ एकत्रित बसून खेळायला हवा. प्रास्ताविक शब्दसारथीचे संचालक पराग पोतदार यांनी केले. सूत्रसंचालन स्वप्नगंधा वस्ते यांनी केले. मनिषा पोतदार यांनी आभार मानले.
