आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

चिंचवडच्या मंडलाधिकार्‍यास लाच घेताना अटक

Spread the love

पुणे : वाल्हेकरवाडी येथे बांधलेल्या बंगल्याची नोंद ७/१२ उतार्‍यावर करण्यासाठी ५ लाख रुपयांची लाच मागून ४ लाख रुपये स्वीकारताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने चिंचवडच्या मंडलाधिकार्‍याला रंगेहाथ पकडले. सुरेंद्र साहेबराव जाधव (वय ५६) असे या मंडलाधिकार्‍याचे नाव आहे.

याबाबत एका ५३ वर्षाच्या नागरिकाने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांनी वाल्हेकरवाडी येथे ६ गुंठे जागा घेऊन त्यावर एक बंगला बांधला होता. या बंगल्याची सात बारा उतार्‍यावर नोंद करण्यासाठी मंडलाधिकारी सुरेंद्र जाधव याने तक्रारदाराकडे ५ लाख रुपयांची लाच मागितली होती.

याची तक्रार लाच लुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली. या तक्रारीची ४ मार्च रोजी पडताळणी करण्यात आली. त्यात सुरेंद्र जाधव याने तडजोडीअंती ४ लाख ५० हजार रुपये लाच घेण्याचे मान्य केले.

त्यानंतर चिंचवड येथील मंडलाधिकारी कार्यालयात सापळा रचण्यात आला. त्यानंतर मंडलाधिकारी कार्यालयाच्या पार्किंगमध्ये तक्रारदार यांच्याकडून सुरेंद्र जाधव यांनी ४ लाख रुपयांची लाच स्वीकारली.

ती लाच त्यांनी त्यांच्या ह्युंदाई क्रेटा कारमध्ये ठेवली. त्यावेळी त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले. पंचासमक्ष कारमधून लाचेची रक्कम जप्त करण्यात आली. सुरेंद्र जाधव याच्याविरुद्ध पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्याला अटक करण्यात आली.

ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपअधीक्षक भारती मोरे अधिक तपास करीत आहेत.