आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

दोघांकडून ११ लाख ४० हजारांचे मॅफेड्रॉन जप्त

Spread the love

पुणे : अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी थांबलेल्या दोघांना अंमली पदार्थ विरोधी पथकाने पकडले असून, त्यांच्याकडून ११ लाख ४० हजार रुपयांचे ५७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) जप्त केले आहे. अदीब बशीर शेख (वय २९, रा. पेन्शनवाला मस्जिद, नाना पेठ) आणि यासीर हशीर सय्यद (वय ३०, रा. मिठानगर, कोंढवा) अशी त्यांची नावे आहेत.

अंमली पदार्थ विरोधी पथक नाना पेठेत गस्त घालत होते. समर्थ पोलीस ठाण्यातील अंमलदारही त्यांच्या सोबत होते. गस्त घालत असताना पोलीस अंमलदार आझाद पाटील यांना नाना पेठेतील कादर भाई गल्लीत दोघेजण अंमली पदार्थ विक्रीसाठी उभे असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी तिथे जाऊन खात्री केली असता, दोघेजण संशयास्पदरीत्या उभे असल्याचे आढळले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. अदीब शेखकडे मॅफेड्रॉन हा अंमली पदार्थ आढळून आला.

चौकशीत त्याने हा मॅफेड्रॉन विक्रीसाठी यासीर शेखकडून घेतल्याची माहिती दिली. दोघांकडून अ‍ॅपल कंपनीचे १ लाख रुपये किंमतीचे दोन मोबाईल, मॅफेड्रॉन पावडर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा आणि इतर साहित्य असा एकूण १३ लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे, सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, पोलीस अंमलदार आझाद पाटील, मयूर सूर्यवंशी, साहिल शेख, संदीप जाधव, उदय राक्षे, योगेश मांढरे, युवराज कांबळे तसेच समर्थ पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार इम्रान शेख आणि कल्याण बारोटे यांनी केली आहे.