आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

फसवणुकीच्या आरोपाखालील दोन आरोपी फरार

Spread the love

पुणे : पुणे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने अविनाश अर्जुन राठोड व विशाखा अविनाश राठोड या दोन आरोपींविरुद्ध हजर राहण्यासाठी जाहीरनामा काढला आहे. आर्थिक फसवणुकीच्या गंभीर आरोपांमुळे दोघांवर गुन्हा दाखल असून, न्यायालयाने त्यांना ७ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

चतुःशृंगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दाखल असलेल्या एका फसवणुकीच्या गुन्ह्यातील दोन मुख्य आरोपी अविनाश अर्जुन राठोड आणि विशाखा अविनाश राठोड हे अद्याप फरार असल्याने पुणे जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांच्याविरोधात जाहीरनामा जारी केला आहे.

दोघे आरोपी फ्लॅट नं. ३०१, सर्वे नं. १५४, आनंदबन सोसायटी, रावेत, पुणे तसेच पो. साखरा, ता. दारव्हा, जि. यवतमाळ आणि तरनोळी, ता. दारव्हा, जि. यवतमाळ येथील रहिवासी असून, त्यांनी भारतीय दंड संहिता कलम ४२० (फसवणूक), ४०६ (विश्वासघात), ४०९ (गुन्हेगारी विश्वासघात), ३४ (सामूहिक हेतू) तसेच M.P.I.D. कायद्याच्या कलम ३ व ४ अंतर्गत गुन्हे केले असल्याचा आरोप आहे.

पोलिसांकडून वारंवार शोध घेतला असता आरोपी सापडले नाहीत. त्यामुळे न्यायालयाने हे दोघे हेतुपुरस्सर स्वतःला लपवत असल्याचे नमूद केले आहे. परिणामी, त्यांना ७ मार्च २०२५ रोजी सकाळी ११ वाजता न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या प्रकरणी चतुःशृंगी पोलिस ठाणे आणि आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू असून, पोलिसांनी जनतेला आवाहन केले आहे की, संबंधित आरोपींबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा.