पद्मावतीत दहशत माजविणारा गुंड स्थानबद्ध
एमपीडीए कायद्यान्वये पोलीस आयुक्तांची कारवाई : नागपूर कारागृहात रवानगी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : पद्मावती येथील तळजाई वसाहतीत दहशत माजवणाऱ्या गुंडावर महाराष्ट्र झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यांतर्गत (एमपीडीए) कारवाई करण्याचा आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. साहिल ऊर्फ भावड्या संतोष कुचेकर (वय २१, रा. तळजाई वसाहत, पद्मावती) असे या अट्टल गुन्हेगाराचे नाव आहे.
पुणे शहरातील वाढत्या गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक पावले उचलली असून, शहरातील सराईत गुन्हेगारांवर प्रभावी कारवाई करण्याचे आदेश सर्व वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना दिले होते.
साहिल कुचेकर हा २०२२ पासून सहकारनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारी कारवायांमध्ये सक्रिय आहे. त्याच्या विरोधात शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्यात घातक शस्त्रे जवळ बाळगणे, मनाई आदेशाचा भंग करून दहशत निर्माण करणे, दुखापत करणे, वाहनांची तोडफोड करणे, जबरी चोरी करताना खुनाचा प्रयत्न करणे यांसारख्या पाच गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे.
साहिल कुचेकरवर वेळोवेळी प्रतिबंधक कारवाई करूनही त्याच्या वागणुकीत कोणताही बदल झालेला नव्हता. तो अत्यंत क्रूर, खुनशी आणि भांडखोर स्वभावाचा असून, लोकांमध्ये कुरापती काढून मारहाण करून गंभीर गुन्हे करत होता.
त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड यांनी त्यास स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर केला. या प्रस्तावाचे अवलोकन करून अमितेश कुमार यांनी त्याला नागपूर कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला.
हा आदेश झाल्यानंतर साहिल कुचेकर फरार झाला होता. सहकारनगर तपास पथकाने २ मार्च रोजी त्याला सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील शिखर शिंगणापूर येथून ताब्यात घेतले आणि त्याची नागपूर कारागृहात रवानगी करण्यात आली.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, सहायक पोलीस आयुक्त स्मिता पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल गौड, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरेखा चव्हाण यांच्या सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक सागर पाटील, सहायक पोलीस उपनिरीक्षक बापू खुटवड, पोलीस अंमलदार भाऊसाहेब आहेर, अमोल पवार, महेश मंडलिक, सागर सुतकर, विनायक एडके, बजरंग पवार, आकाश किर्तीकर, अमित पदमाळे, गोरख ढगे, योगेश ढोले, महेश भगत, प्रदीप रेणुसे, खंडू शिंदे यांनी केली.
