पीएमआरडीएची विशेष मोहीम : ९० हजार चौरस मीटरवरील अतिक्रमण हटवले
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे शहराभोवती असलेल्या राष्ट्रीय व राज्य महामार्गांवरील अनधिकृत बांधकामे हटवण्याची मोहीम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (PMRDA) सुरू केली आहे. ३ ते ५ मार्च दरम्यान विविध भागांतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत एकूण ९०४ बांधकामे निष्कासित करण्यात आली. या कारवाईमुळे संबंधित भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे.
पुणेकरांना वाहतूक कोंडीमधून मुक्त करण्यासाठी पीएमआरडीएने विशेष मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी (दि. ५) पुणे-नाशिक रस्ता, पुणे-सोलापूर रस्ता आणि पुणे-चांदणी चौक ते पौड रस्ता या भागांतील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली.
सकाळी ९.३० वाजल्यापासून सुरू झालेल्या कारवाईत २५२ अनधिकृत बांधकामे (२५,२०० चौ.फु.) हटवण्यात आली. विशेष म्हणजे, बहुतांश स्थानिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घेतली.
या मोहिमेच्या पहिल्या दिवशी ३ मार्चला २०१ अनधिकृत बांधकामे (२०,१०० चौ.फु.), तर ४ मार्चला ४५३ अनधिकृत बांधकामे (४५,३०० चौ.फु.) हटवण्यात आली.
गेल्या तीन दिवसांत एकूण ९०४ अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत ९०,६०० चौ. मीटर क्षेत्रावरील बांधकामे निष्कासित करण्यात आली. कारवाईदरम्यान, अधिकाऱ्यांनी संबंधित भागात अनधिकृत बांधकामे करू नयेत, असे आवाहन केले.
ही पीएमआरडीए हद्दीतील अनधिकृत बांधकामांचा सर्व्हे सुरू असून, अशा बांधकामांवर पुढील काळातही निष्कासनाची कारवाई सुरू राहणार असल्याचे महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांनी स्पष्ट केले.
ही कारवाई महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे आणि पोलीस अधीक्षक तथा दक्षता अधिकारी अमोल तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. उपजिल्हाधिकारी डॉ. दीप्ती पाटील, कनिष्ठ अभियंता गणेश जाधव, हरीश माने, ऋतुराज सोनावणे, प्रितम चव्हाण, दीप्ती घुसे, सागर जाधव, दीपक माने, प्रशांत चौगले, तेजस मदने, विष्णू आवाड आणि स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांनी या मोहिमेत सहभाग घेतला.
