माजी खासदार राजू शेट्टी यांचा आरोप, कारागृहात मीठापासून कांद्यांपर्यंत अव्वाच्या सव्वा दराने खरेदी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : राज्यातील कारागृहामध्ये रेशन खरेदी व विद्युत उपकरणांच्या खरेदीमध्ये सेंट्रलाईज पद्धतीचा अवलंब करुन अव्वाच्या सव्वा दराने खरेदी करुन ५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचा घोटाळा झाला आहे. २०२३ ते २०२५ – २६ या वर्षांमध्ये अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता व पोलीस उपमहानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या काळात हा घोटाळा झाला असून त्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
राज्यातील कारागृहामध्ये रेशन खरेदी व विद्युत उपकरणांच्या खरेदीमध्ये सेंट्रलाईज पद्धतीचा अवलंब करुन अव्वाच्या सव्वा दराने खरेदी करुन ५०० कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचा घोटाळा झाला आहे. २०२३ ते २०२५ – २६ या वर्षांमध्ये अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता व पोलीस उपमहानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांच्या काळात हा घोटाळा झाला असून त्यांच्या संपत्तीची चौकशी व्हावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.
राज्यातील कारागृहामध्ये कैद्यांच्या पालनपोषणासाठी राज्य शासन वर्षाकाठी शेकडो कोटी रुपये खर्च करते. रेशन व कॅन्टीनमधून कारागृहातील कैद्यांसाठी दैनंदिन लागणारे गहु, तांदुळ, साखर, डाळी, दुध, फळे, भाजीपाला, मटण, अंडी, बेकरी पदार्थ या सारख्या वस्तूची खरेदी करण्यात येतात.
कारागृह विभागाने सेट्रलाईज पद्धतीने निविदा प्रक्रिया करुन राज्यातील सर्व कारागृहांना रेशन व कॅन्टीनमधील साहित्य खरेदी करत असते. हे साहित्य खरेदी करत असताना त्यांचे दर भरमसाठ वाढविलेले असून बाजारभावापेक्षा तसेच मंत्रालयीन व इतर उपहारगृहामध्ये खरेदी करण्यात येणारे साहित्य आणि कारागृहासाठी खरेदी करण्यात आलेले साहित्य यांच्या दरात जमीन अस्मानाचा फरक आहे.
दिवाळीमध्ये कैद्यांना खरेदी केलेल्या फराळाचे दर तर गगनाला भिडणारे व बाजारातील नावाजलेले कंपन्यांचे होते. कैद्यांना मात्र स्थानिक बाजारातील निकृष्ठ दर्जाचे लाडु, चिवडा व इतर फराळाचे साहित्याचा पुरवठा करण्यात आला आहे.
कारागृहासाठी मीठाची खरेदी २३.९५ रुपये किलो या दराने करण्यात आली आहे. जे बाजारात सर्वसाधारणपणे १० रुपये किलो असते. कारागृह या वस्तू टनाने खरेदी करते़ तेव्हा त्यापेक्षा कमी दराने ते मिळायला पाहिजे, पण इथे उलट झाले आहे. केवळ मीठामध्ये ४८ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.
कांद्याचे भाव वर्षातील काही दिवस ८० -९० रुपये किलो पर्यंत जातात. नंतर तो अगदी १० रुपये किलोपर्यंत दर पडतात. परंतु, कारागृहात मात्र वर्षभर ८८ रुपये किलो दराने २०० टन खरेदी केला जात आहे. तसेच डाळी, साखरेपासून सर्वच वस्तूने दर अव्वाच्या सव्वा आहेत़ याशिवाय विद्युत उपकरणांच्या खरेदीतही मोठा घोटाळा झाल्याचे शेट्टी यांनी सांगितले.
अपर पोलीस महासंचालक अमिताभ गुप्ता आणि विशेष पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांची चौकशी केली जावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. याबाबत अधिकाऱ्यांना विचारले तर त्यांनी उत्तर दिले की, कारागृहात जर चांगले जेवण कैद्यांना दिले तर या ठिकाणी कैदी ठेवण्यास जागा पुरणार नाही. ही एक प्रकारची शिक्षाच असल्याचे सांगितले.
मनमानी पद्धतीने खरेदी
राजू शेट्टी यांनी कारागृह रेशन विभागातील मनमानी निविदा खरेदी सन २०२४ ते २०२६ मधील यातील फरक दर्शविणारा तक्ताच दिला आहे. त्यात तुरडाळ ही २०९ रुपये किलो, अख्खा मसूर २०९ रुपये किलो, साखर ४८ रुपये किलो, गुळ ७९ रुपये किलो अशा दराने खरेदी करण्यात आली आहे. बाजारात या वस्तूंच्या उच्चत्तम किंमतीला त्या खरेदी करण्यात आल्या आहेत.
कारागृहातील निकृष्ट जेवणाचा अनुभव
माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले की, मी येरवडा कारागृहात कैदी म्हणून असताना कारागृहात कैद्यांना दिले जाणारे जेवण व उपहारगृहातील साहित्य निकृष्ठ दर्जाचे व भेसळ युक्त असते, याचा अनुभव घेतला आहे. पाणचट चहा, कच्च्या चपात्या, न शिजवता दिला जाणारा भात, चटणी व मीठ नसलेल्या भाज्या व आमटी, बुरशीजन्य बेकरी पदार्थ कैद्यांना दिले जात होते.
