बार्शी तालुका पोलिसांची तडफदार कारवाई : तीन दरोडेखोर पिस्टलसह
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
बार्शी – पवन श्रीश्रीमाळ : बार्शी तालुक्यातील सुर्डी येथे असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी (DCC) बँकेवर काही तासांपूर्वीच दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकला. मात्र, बार्शी तालुका पोलिसांनी केवळ 45 मिनिटांत दरोडेखोरांना जेरबंद करून एक उत्कृष्ट कामगिरी बजावली.
प्राथमिक माहितीनुसार, चार ते पाच दरोडेखोर बँकेत घुसले आणि कर्मचाऱ्यांना धमकावत कॅश काउंटरमधील लाखोंची रोकड लुटून पसार झाले. काही कर्मचाऱ्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, दरोडेखोरांनी त्यांना शस्त्रांचा धाक दाखवला.
घटनेची माहिती मिळताच बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे यांनी तातडीने तपासाची सूत्रे फिरवली. त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाने जलद गतीने तपास सुरू केला आणि कोरफळे भागात दरोडेखोरांचा पाठलाग करत त्यांना अटक करण्यात यश मिळवले.
या यशस्वी कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभय उंदरे, पोलीस कॉन्स्टेबल सिद्धेश्वर लोंढे, युवराज गायकवाड, सागर शेंडगे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच उपविभागीय अधिकारी जालिंदर नालकूल यांनी मदत करत दरोडेखोरांना जेरबंद करण्यात मोलाची भूमिका निभावली.
तालुका पोलिसांनी दरोड्याच्या पार्श्वभूमीवर अधिक तपास सुरू केला आहे. दरोडेखोरांकडून अजून काही महत्त्वाची माहिती मिळू शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. बार्शी तालुका पोलिसांच्या तत्परतेमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक दिलीप ढेरे आणि त्यांच्या पथकाने दाखवलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे पोलीस दलाच्या दक्षतेचे आणि क्षमतेचे पुन्हा एकदा प्रत्यंतर आले आहे.
