महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (PMRDA) कार्यक्षेत्र मोठ्या प्रमाणावर विस्तारलेले आहे. त्यामुळे ग्रामस्तरावर कार्यालयाच्या कामकाजाची माहिती पोहोचावी, या उद्देशाने प्रथमच दिनदर्शिकेच्या माध्यमातून पीएमआरडीएची यंत्रणा गावागावांत पोहोचवली जात आहे. या दिनदर्शिकेमध्ये पीएमआरडीएची रचना, कार्यपद्धती आणि विविध योजनांची माहिती समाविष्ट करण्यात आली आहे, त्यामुळे ती स्थानिक नागरिकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या या माहितीयुक्त दिनदर्शिकेचे पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील ग्रामपंचायत कार्यालयांसह विविध संबंधित यंत्रणांना वितरण सुरू आहे.
प्रशासकीय कामकाज गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री यांनी सप्तसुत्री कार्यपद्धती निश्चित केली असून त्यानुसार पीएमआरडीएत आवश्यक कार्यवाही सुरू आहे. पीएमआरडीएच्या कामकाजात गतिशीलता, पारदर्शकता आणि नागरिकांची अधिकाधिक कामे ऑनलाइन करण्यावर भर दिला जात आहे.
याच उद्देशाने पीएमआरडीएच्या दिनदर्शिकेचे अनावरण नुकतेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले. या दिनदर्शिकेत पीएमआरडीएच्या कार्यपद्धतीचे स्वरूप, विभागवार माहिती आणि संपर्कासाठी आवश्यक ई-मेल तसेच दूरध्वनी क्रमांकांचा समावेश आहे.
पीएमआरडीएच्या कार्यक्षेत्रात एकूण ६९७ गावे येतात. या गावांतील ग्रामपंचायतींना ही दिनदर्शिका पाठवण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये पीएमआरडीएची कार्यपद्धती पोहोचावी, या हेतूने ही माहिती समाविष्ट असलेली दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आली आहे.
या दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर विभागवार कामकाजाची सविस्तर माहिती दिली आहे. पीएमआरडीएचे कार्यक्षेत्र ग्रामीण भागापर्यंत विस्तारलेले असल्याने सर्वसामान्य नागरिकांपर्यंत माहिती पोहोचण्यासाठी ही दिनदर्शिका महत्त्वाची ठरणार आहे.
अनेक दुर्गम भागांमध्ये अद्याप इंटरनेट सुविधा नसल्याने वेबसाईट व ऑनलाइन सेवा पोहोचण्यात अडचणी येतात. त्यामुळे हा घटक विकास प्रक्रियेतून वंचित राहू नये, म्हणून त्यांना पीएमआरडीएची कार्यपद्धती समजावी, यासाठी ही दिनदर्शिका त्यांच्या पर्यंत पोहोचवण्यात येत आहे.
या दिनदर्शिकेत पीएमआरडीएच्या विविध विभागांची आवश्यक माहिती देण्यात आली आहे. वार्षिक स्वरूपाच्या या दिनदर्शिकेत दरमहा एका विभागाची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
तसेच, या दिनदर्शिकेच्या प्रती लोकप्रतिनिधी, शासकीय कार्यालये, महत्त्वाचे अधिकारी व कर्मचारी यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी वितरण करण्यात येत आहे. महानगर आयुक्त डॉ. योगेश म्हसे यांच्या संकल्पनेतून तयार झालेली ही माहितीपूर्ण दिनदर्शिका पीएमआरडीएची कार्यपद्धती अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्यास मदत करेल.
ग्रामीण स्तरावर पीएमआरडीएच्या योजनांची माहिती सहज उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा उपक्रम ठरणार आहे.
