वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस, चार दुचाकी जप्त : बिबवेवाडी पोलिसांची कामगिरी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि आरोपीच्या कार्यपद्धतीवरून (मोडस) बिबवेवाडी पोलिसांनी एका सराईत वाहनचोराला अटक केली. त्याच्याकडून वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, चार दुचाकी वाहने जप्त करण्यात आली आहेत.रविराज विलास माने (वय २४, रा. साईनगर, कोंढवा) असे या वाहनचोराचे नाव आहे.
बिबवेवाडी येथील टाटा शोरूमजवळ दुचाकी पार्क केली असता, ती १ मार्च रोजी चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले आणि पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळी भेट देऊन तेथील सीसीटीव्ही फुटेज तपासले.
आरोपीच्या कार्यपद्धतीवरून पोलीस अंमलदार संजय गायकवाड आणि ज्योतिष काळे यांना त्यांच्या बातमीदारांकडून माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी रविराज माने याला अटक केली. चौकशीदरम्यान, मौजमजेसाठी त्याने दुचाकी चोरल्याची कबुली दिली.
त्याच्याकडून चार दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत. बिबवेवाडी आणि विश्रामबाग पोलीस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित दोन दुचाकींच्या मूळ मालकांचा शोध घेतला जात आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर साळुंखे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, पोलीस उपनिरीक्षक अशोक येवले, पोलीस हवालदार राजश्री जाधव, संजय गायकवाड, पोलीस अंमलदार ज्योतिष काळे, शिवाजी येवले, विशाल जाधव, आशिष गायकवाड, सुमित ताकपेरे, प्रणय पाटील आणि दत्ता शिंद्रे यांनी केली आहे.
