व्याजाच्या पैशांवरून त्रास : व्याजाने पैसे देणाऱ्याची पोलीस चौकशी करणार का ?
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील बिबवेवाडी परिसरातील हिरे व्यापारी तिथल शहा यांनी स्वतःच अपहरणाचा बनाव रचल्याची कबुली पोलिसांसमोर दिली आहे. त्यांनी विविध व्यापाऱ्यांकडून व्याजाने पैसे घेतले होते, परंतु ते परत देणे शक्य न झाल्याने त्यांनी हा बनाव केला.
सोमवारी रात्री त्यांच्या पत्नीने पोलिसांना अपहरणाची माहिती दिली होती. अपहरणकर्त्यांनी २ कोटी रुपयांची खंडणी मागितली असून पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे सांगण्यात आले होते.
पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असता, नवले पुलाजवळ शहा यांची दुचाकी सापडली व त्यांचा मोबाईल बंद असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे कळंबोली आणि विलेपार्ले येथे तपास केला.
चौकशीत व्याजाच्या पैशांवरून शहा यांचे अपहरण झाल्याचा संशय होता. मात्र, शुक्रवारी सायंकाळी तिथल शहा स्वतः बिबवेवाडी पोलीस ठाण्यात हजर झाले आणि त्यांनी खोट्या अपहरणाचा कबुलीजबाब दिला.
शहा यांनी सांगितल्याप्रमाणे, त्यांनी १० ते १२ जणांकडून व्याजाने पैसे घेतले होते, मात्र व्याजाचा भरणा करता न आल्याने त्यांनी खोट्या अपहरणाचा बनाव केला. त्यांनी नवले पुलाजवळ आपला फोन बंद करून दुचाकी सोडली आणि तेथून रावेतला गेले.
तिथून खासगी गाडीने कळंबोली, नंतर मुंबई सेंट्रलमधील लॉजमध्ये दोन दिवस राहिले व शेवटी विलेपार्ले येथे गेले. या प्रकरणात पोलिसांची दिशाभूल केल्याबद्दल तिथल शहा यांच्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी सांगितले.
शहा यांनी व्याजाने पैसे घेतलेले १०-१२ लोक कोण होते, त्यांनी शहा यांना दिलेल्या पैशांवर व्याज आकारण्यासाठी कायदेशीर परवाना (सावकारी कायद्याअंतर्गत लायसन्स) घेतले होते का, याचा तपास पोलीस करणार आहेत का? अशा प्रकारे बेकायदेशीर सावकारी प्रकरणात अधिक चौकशी होणार का, हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. ही घटना व्याजाच्या व्यवहारांमुळे निर्माण झाल्याने सावकारी कायद्याच्या अंमलबजावणीबाबत प्रशासनाची पुढील पावले काय असतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
