जैन समाजाच्या प्रगतीचा दृढ पाया
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : ११० वर्षांपूर्वी आचार्य भगवंत पंजाब केसरी विजय वल्लभ सुरीश्वर यांनी जैन समाजाला शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा संकल्प केला. समाजाच्या काही घटकांचा विरोध असतानाही त्यांनी शिक्षण आणि संस्कार यांचा संगम साधत समाजाला नवी दिशा दिली, असे प्रतिपादन पद्मश्री नित्यानंद सुरीश्वर यांनी केले.
श्री महावीर जैन विद्यालयातर्फे उभारलेल्या ४०० विद्यार्थ्यांसाठीच्या जेएम फायनान्शियल फाउंडेशन विद्यार्थीगृह भवनाचे लोकार्पण पद्मश्री नित्यानंद सुरीश्वर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी फोर्स मोटर्स लि. आणि अमर प्रेरणा ट्रस्टचे चेअरमन डॉ. अभय फिरोदिया, आचार्य भगवंत गच्छाधीपती आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी श्री महावीर जैन विद्यालयाच्या ११० वर्षांच्या गौरवशाली इतिहासाची स्मृती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच, शिक्षण क्षेत्राला मदत करणाऱ्या प्रमुख देणगीदारांचा विशेष सन्मान करण्यात आला.
“महावीर जैन विद्यालये ही केवळ शिक्षणसंस्था नसून, समाजाच्या मूल्यांचा वारसा जपणारी केंद्रे आहेत. येथे शिक्षण घेऊन बाहेर पडलेले विद्यार्थी आज राष्ट्राच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान देत आहेत,” असे पद्मश्री नित्यानंद सुरीश्वर यांनी आपल्या भाषणात नमूद केले.
“धर्म आणि शिक्षण यांचा परस्पर पूरक विचार समाजाच्या प्रगतीसाठी आवश्यक आहे. जैन परंपरा आणि तत्त्वज्ञान आजही शिक्षण क्षेत्राला दिशादर्शक ठरत आहेत,” असे मत डॉ. अभय फिरोदिया यांनी व्यक्त केले.
महावीर जैन विद्यालयाच्या पुढील योजनांचा आढावा घेताना, ५० कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असल्याचे सांगत, कल्पेश शहा यांनी उपस्थितांना मदतीचे आवाहन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज शहा यांनी केले, सूत्रसंचालन हसमुख गुंदेचा यांनी केले आणि आभार प्रदर्शन राजेश शहा यांनी मानले. या भव्य समारंभाने शिक्षण आणि संस्कृतीसाठी समर्पित असलेल्या जैन समाजाच्या योगदानाचा उजाळा दिला.
