राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2025
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दरवर्षी अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील 75 विद्यार्थ्यांना परदेशात उच्च शिक्षणासाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजना अंतर्गत शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी 30 एप्रिल 2025 पर्यंत ऑनलाइन अर्ज करावा, असे समाज कल्याण विभागाने आवाहन केले आहे.
अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना परदेशात पदव्युत्तर पदवी आणि संशोधनात्मक अभ्यासक्रम (पीएच.डी.) करण्यासाठी आर्थिक सहाय्य देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक विद्यार्थ्यांना अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अर्ज प्रक्रिया : विद्यार्थ्यांनी शासनाच्या www.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरील “ताज्या घडामोडी” या लिंकवरून अर्ज डाउनलोड करावा. अर्ज पूर्ण भरून आवश्यक कागदपत्रांसह https://fs.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन सादर करावा.
अर्जाची सुस्पष्ट छापील प्रत आणि ऑफलाइन अर्ज समाज कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे येथे सादर करावी. राज्यातील पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा आणि 30 एप्रिल 2025 पूर्वी अर्ज सादर करावा, असे आवाहन समाज कल्याण आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी केले आहे.
योजनेअंतर्गत लाभ – या योजनेंतर्गत महाराष्ट्रातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना, क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 200 च्या आत असलेल्या परदेशातील शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी शिष्यवृत्ती मंजूर केली जाते. योजनेअंतर्गत निवड झालेल्या 75 विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य दिले जाणार असून, त्यातील 30 टक्के जागा गुणवत्तेनुसार महिला उमेदवारांसाठी राखीव असतील.
अर्ज करण्यासाठी आवश्यक अटी – विद्यार्थ्यांना विमान प्रवास भाडे, शिक्षण शुल्क, निर्वाह भत्ता, आकस्मिक खर्च याचा लाभ मिळणार आहे.
कमाल वयोमर्यादा : पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी – 35 वर्षे, पीएचडी अभ्यासक्रमासाठी – 40 वर्षे, भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या संकेतस्थळावरील एमडी व एमएस अभ्यासक्रमच प्रवेशासाठी पात्र असतील.
