सुखसागरनगरमधील खुनाचा प्रयत्न प्रकरणी चौघांना अटक
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : प्रेमसंबंधातून तरुणाचे अपहरण करून त्याला लाथाबुक्क्यांनी आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे.
याबाबत ऋषिकेश दीपक खोपडे (वय २६, रा. सुखसागरनगर) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी प्रणव प्रशांत जगताप (वय २५, रा. बिबवेवाडी), सार्थक संतोष भोर (वय २१, रा. धनकवडी), कुमार तुळशीराम भागवत (वय २४) आणि अमर अशोक लोंढे (वय २०, रा. कात्रज) यांना अटक केली आहे.
ही घटना ११ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजता सुखसागरनगर ते नवले पूल आणि त्यानंतर आंबेगाव बुद्रुक दरम्यान घडली. या घटनेत ऋषिकेश खोपडे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर भारती हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऋषिकेश खोपडे यांचे सुखसागरनगर येथे कपड्याचे दुकान असून ते मार्केटयार्डमध्येही काम करतात. प्रणव जगताप हा त्यांचा बालपणीचा मित्र असून तो त्यांच्या घरी येत-जात असतो.
११ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजता ऋषिकेश खोपडे सुखसागरनगरमधील शाहू मोबाईल शॉपीमध्ये दुरुस्तीला दिलेला मोबाईल घेण्यासाठी गेले होते. त्यावेळी तेथे प्रणव जगताप, सार्थक भोर आणि दोन अनोळखी तरुण आले. प्रणव जगताप याने खोपडे यांना उद्देशून, “तू माझ्या बहिणीच्या नादाला का लागला आहेस? तुला मी सोडणार नाही,” असे म्हणत मारहाण करण्यास सुरुवात केली.
त्यानंतर त्यांनी खोपडे यांना मोबाईल शॉपीच्या बाहेर आणून जबरदस्तीने एका गाडीत बसवले. गाडीतून नेत नवले पुलाजवळ आणले आणि अंधारात चौघांनी लाथाबुक्क्यांनी, लाकडी दांडक्याने आणि दगडाने बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना पुन्हा गाडीत बसवून आंबेगाव बुद्रुक येथील त्रिमूर्ती गार्डनजवळ रस्त्यावर फेकून आरोपी पळून गेले.
यानंतर खोपडे यांच्या भावाने त्यांना भारती हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यांच्या डोक्याला, पोटाला, दोन्ही हातांना, दोन्ही पायांना आणि पाठीवर गंभीर मार लागला आहे. पोलिसांनी चौघांना अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक विकास बाबर पुढील तपास करत आहेत.
