गुन्हे शाखेकडून लष्कर न्यायालयात हजार पानांचे दोषारोपपत्र दाखल
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : सतीश वाघ यांच्या खुनाचा मुख्य सूत्रधार अक्षय जावळकर असून, त्याने पत्नी मोहिनी वाघसोबत कट रचून त्यांचा खून केला. त्याआधी जादूटोण्याचा प्रयोग झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुन्हे शाखेने सतीश वाघ खूनप्रकरणी हजार पानांचे दोषारोपपत्र लष्कर न्यायालयात दाखल केले असून, त्यातून अनेक गोष्टी उघडकीस आल्या आहेत. अक्षय जावळकर, मोहिनी वाघ, अतिश जाधव, पवन शर्मा, नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे या सहा जणांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
सतीश वाघ यांचा ९ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मॉर्निंग वॉकला जात असताना अपहरण करून त्यांच्यावर ७२ वार करण्यात आले आणि त्यांचा खून झाला. त्यानंतर मृतदेह शिंदवणे घाटात फेकून देण्यात आला.
अक्षय जावळकर हा सतीश वाघ यांच्याकडे भाडेकरू म्हणून राहत होता. २०१३ पासून अक्षय आणि मोहिनी वाघ एकमेकांच्या संपर्कात होते. २०१७ मध्ये सतीश वाघ यांना मोहिनी आणि अक्षय यांच्या संबंधांचा संशय आल्याने त्यांनी अक्षयला घर सोडण्यास सांगितले.
तो दुसरीकडे राहू लागला तरी त्यांच्यातील अनैतिक संबंध सुरूच होते. घरखर्चासाठी सतीश मोहिनीला पैसे देत नव्हता, तसेच तो तिला मारहाण करत असे. सतीशच्या त्रासाला कंटाळून मोहिनी अक्षयला त्याचा काटा काढण्यास सांगत होती.
सतीशचा खून करण्यासाठी दोघांनी एक वर्षापासून नियोजन सुरू केले होते. घरात भेटणे शक्य नसल्याने ते लॉजवर भेटत होते. खून करण्यापूर्वी मोहिनीने एका मांत्रिक महिलेचीही मदत घेतली होती.
सतीश वाघ यांच्या खुनासाठी अक्षय जावळकर याने पाच लाखांची सुपारी दिली होती. सुरुवातीला शर्मा याला दीड लाख रुपये अॅडव्हान्स म्हणून देण्यात आले होते. सतीश वाघ यांचा पाय तोडून त्यांना एका जागी बसवायचे किंवा त्यांचा खून करून कायमचा वाटेतून दूर करायचे, असा त्यांचा बेत होता.
सतीश यांचा एकदाचा बंदोबस्त झाला की हॉटेल आणि खोल्यांचे भाडे तसेच त्यातून मिळणारे सर्व उत्पन्न मोहिनीच्या हातात येणार होते. त्यामुळेच पाच लाखांची सुपारी देण्यात आली होती.
या गुन्ह्यातील न्यायवैद्यकीय पुरावे, आरोपी, फिर्यादी, साक्षीदार यांचे जबाब नोंदवले आहेत. वाघ यांचा मोबाईल, गुन्ह्यात वापरलेली कार आणि हत्यारे जप्त करण्यात आले आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अंमली पदार्थविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्या पथकाने हे दोषारोपपत्र दाखल केले आहे.
