बुलढाणा कारागृहात एक वर्षासाठी स्थानबद्ध
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दुखापत करणे असे सहा गंभीर गुन्हे असलेल्या सराईत गुन्हेगारावर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए अंतर्गत कारवाई करून त्याला एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला आहे. प्रतिक योगेश चोरडे (वय २१, रा. ओम साई अपार्टमेंट, केशवनगर, मुंढवा) असे या गुन्हेगाराचे नाव आहे.
प्रतिक चोरडे हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, दुखापत करणे आणि इतर असे सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. मुंढवा आणि केशवनगर परिसरात त्याची दहशत असल्याने नागरिक त्याच्याविरुद्ध तक्रार देण्यास पुढे येत नाहीत.
त्याच्यामुळे सार्वजनिक शांततेस धोका निर्माण झाल्याने पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय मोगले व त्यांच्या पथकाने स्थानबद्धतेचा प्रस्ताव तयार करून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे सादर केला.
अमितेश कुमार यांनी त्याची पडताळणी करून प्रतिक चोरडे याला एक वर्षासाठी बुलढाणा कारागृहात स्थानबद्ध करण्याचा आदेश दिला. हडपसर पोलिसांनी प्रतिक चोरडे याला ताब्यात घेऊन स्थानबद्धतेचा आदेश बजावला. त्याला बुलढाणा कारागृहात ठेवण्यासाठी बंदोबस्तात रवाना करण्यात आले.
