हजारो नागरीकांची तहान भागणार
महाराष्ट्र जैन वार्ता
पुणे : दरवर्षी प्रमाणे याही वर्षी स्व. इंदुमती बन्सीलाल संचेती या ट्रस्टच्या वतीने मार्केट यार्डात पाणपोईची सुरुवात करण्यात आली. त्यामुळे मार्केट यार्डात येणाऱ्या हजारो नागरिकांची तहान भागणार आहे. तसेच पक्षांसाठी देखील दाना-पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना अभय संचेती यांनी सांगितले की, “आशिया खंडातील क्रमांक दोनची बाजारपेठ असलेल्या मार्केट यार्डात संपूर्ण देशभरातून नागरिक येत असतात. सध्या पुणे शहरात प्रचंड उन्हाचा तडाखा आहे. अशा परिस्थितीत व्यापार करण्यासाठी येणारे व्यापारी, ग्राहक, ट्रक चालक, हमाल बंधू, रिक्षाचालक यांच्यासह असंख्य नागरिक येथे येतात. त्यामुळेच स्व. इंदुमती बन्सीलाल संचेती ट्रस्टच्या वतीने पाणपोईची व्यवस्था करण्यात आली आहे.”
या पाणपोईचे उदघाटन पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अभय छाजेड, श्रीकांत जगताप, अभय संचेती, मनीष संचेती, सुभाष पगारिया, विजय शिंगवी, नितीन नहार, सचिन गदिया, हरकचंद देसरडा, सुरेश वानगोता, महेश गायकवाड, संकेत बोथरा, अयुब शेख, विशाल चांदणे, सुनील दसाडे आदि व्यापारी उपस्थित होते.
“संचेती ट्रस्टने उभारलेली ही पाणपोई उन्हाळ्यात नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. ही समाजसेवा उल्लेखनीय असून, अशा उपक्रमांमुळे समाजामध्ये परोपकाराची भावना वाढीस लागते.” – मिलिंद मोहिते, पोलीस उपायुक्त
“मार्केट यार्डातील व्यापारी, ट्रक चालक आणि नागरिकांच्या सोयीसाठी ही पाणपोई सुरू करण्यात आली आहे. उन्हाळ्यात अशा सुविधा अत्यंत महत्त्वाच्या ठरतात आणि आमचा हा उपक्रम भविष्यातही सुरू राहील.” – अभय संचेती
