कर्मचारी संघटनांची घोषणा : ग्रॅच्युइटीची मर्यादा वाढवण्याची मागणी
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बँक कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत इंडियन बँक्स असोसिएशनबरोबर झालेल्या चर्चेत कोणताही तोडगा न निघाल्याने बँक कर्मचारी संघटनांनी २४ व २५ मार्च रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे. २२ व २३ मार्च हे दिवस शनिवार आणि रविवार असल्याने बँका आधीच बंद राहणार आहेत. त्यामुळे सलग चार दिवस बँकांचे व्यवहार ठप्प राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी आपल्या बँकेशी संबंधित कामे पूर्ण करून घ्यावीत.
बँकांमध्ये सर्व संवर्गातील नोकरभरती तातडीने करावी, तसेच पाच दिवसांचा आठवडा लागू करावा, यासाठी बँक कर्मचाऱ्यांच्या नऊ संघटनांच्या संयुक्त फोरम आणि इंडियन बँक्स असोसिएशन यांच्यात चर्चा सुरू होती.
मात्र, या चर्चेतून कोणताही ठोस निर्णय न झाल्याने देशव्यापी संप घोषित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या आर्थिक सेवा विभागाने बँक कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्यांना कामगिरीनुसार काही प्रोत्साहनपर लाभ (इन्सेंटिव्ह) देण्याची घोषणा केली आहे.
मात्र, कर्मचारी संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. बँक कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या ग्रॅच्युइटीवरील मर्यादा वाढवून ती सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे २५ लाख रुपयांपर्यंत करावी, तसेच ग्रॅच्युइटीची रक्कम आयकरातून मुक्त करावी, अशी मागणी कर्मचारी संघटनांनी केली आहे.
बँक कर्मचार्यांच्या या दोन दिवसांच्या संपामुळे बँकांचे कामकाज मोठ्या प्रमाणावर विस्कळीत होण्याची शक्यता आहे.
