आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

धुलवडीला ४०२ तळीराम वाहनचालकांवर कारवाई

Spread the love

पुणे : होळी आणि धुलीवंदन साजरे करताना वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये, यासाठी वाहतूक शाखेने विशेष मोहिम राबवली. या मोहिमेत मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या ४०२ तळीराम वाहनचालकांवर ड्रंक अँड ड्राइव्ह अंतर्गत कारवाई करण्यात आली. एकूण ६,११८ केसेस दाखल करून ५० लाख ९४ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.

पोलीस आयुक्त अमितेशकुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा आणि अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील यांच्या निर्देशानुसार, होळीचा सण आनंदी आणि सुरक्षित साजरा होण्यासाठी तसेच शहरातील बेशिस्त वाहनचालकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी १४ मार्च रोजी विशेष मोहिम आखण्यात आली.

शहरातील ९० ठिकाणी नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. शहरातील ३७ वाहतूक विभाग व संबंधित पोलीस ठाण्यांकडून राबवलेल्या या मोहिमेत ट्रिपल सीट, रॉंग साइड आणि ड्रंक अँड ड्राइव्ह अशा विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.

यामध्ये ३८६ वाहने जप्त करण्यात आली, तर एकूण ६,११८ केसेस दाखल करून ५०,९४,००० रुपये दंड आकारण्यात आला.