आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

१५ लाखांचे २०० ग्रॅम सोन्याचे दागिने नागरिकांना परत

Spread the love

पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या परिसरातील जबरी चोरी, घरफोडी व इतर चोरीच्या एकूण ११ गुन्ह्यांतील विविध स्वरूपाचे १५ लाख रुपये किमतीचे, २०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले होते. हे जप्त केलेले दागिने फिर्यादींना परत करण्यात आले.

गेल्या काही महिन्यांत भारती विद्यापीठ पोलिसांनी जबरी चोरी, घरफोडी व इतर चोरीच्या ११ गुन्ह्यांतील आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याकडून चोरलेले दागिने हस्तगत केले होते. न्यायालयाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर सोमवारी सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर यांच्या हस्ते ११ फिर्यादींना त्यांचे जप्त केलेले दागिने परत देण्यात आले. चोरीला गेलेले दागिने परत मिळाल्याने महिलांच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, पोलीस उपायुक्त मिलिंद मोहिते, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगांवकर, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राहुलकुमार खिलारे, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी आणि पोलीस अंमलदार उमाकांत ढोले, यास्मीन मणेर, महेश बारवकर, मंगेश पवार, सचिन सरपाले, निलेश खैरमोडे, सचिन गाडे, अभिनय चौधरी, मितेश चोरमोले, सागर बोरगे, बंडू सुतार यांनी केली.