नागपूरच्या पार्श्वभूमीवर शहरात अलर्ट, एसआरपीएफचाही बंदोबस्त
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे: नागपूर येथील दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलिसांनी रात्रभर संपूर्ण शहरात कडक बंदोबस्त ठेवला. शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रात्र जागून काढली.
नागपूरमध्ये सोमवारी मोठ्या प्रमाणावर दगडफेक आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यानंतर संपूर्ण राज्यभर अलर्ट देण्यात आला होता. शहर पोलीस दलातील हजारो वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस अंमलदारांनी संपूर्ण शहरात रात्रभर जागून बंदोबस्त ठेवला.
याबाबत सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी सांगितले की, राज्यात हाय अलर्ट देण्यात आला आहे. नागपूरच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सर्व पोलीस ठाण्यांतील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना आपल्या भागात गस्त घालण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
लोहियानगर, पर्वती, खडकी, कोंढवा अशा संवेदनशील परिसरात विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राज्य राखीव पोलीस दलाच्या (एसआरपीएफ) एका कंपनीचा बंदोबस्त शहरात लावण्यात आला आहे. तसेच, फिक्स पॉइंटवरही बंदोबस्त नेमण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पहाटे २ वाजेपर्यंत पोलीस ठाण्यातच थांबून बंदोबस्तावर नियंत्रण ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
बीट २४ मार्शल रात्रभर गस्त घालत होते. त्यानंतर पहाटेपासून ‘गुड मॉर्निंग’ पथक कार्यान्वित झाले. सर्व पोलीस ठाण्यांच्या सायबर सेलला सोशल मीडियावर लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
समाजात तेढ निर्माण करू शकणाऱ्या व्यक्तींना ताब्यात घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आज दिवसभर शांतता कमिटीच्या बैठका घेण्यात येणार आहेत.
नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता पाळावी, असे आवाहन सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी केले आहे.
