काळेपडळ पोलिसांची कामगिरी : घरफोडीचा गुन्हा उघडकीस
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : गस्त घालणाऱ्या बीट मार्शलांना पहाटेच्या सुमारास एक मुलगा दुचाकी ढकलत नेताना दिसला. जवळ जाताच पोलिसांना पाहून तो पळू लागला. त्याला पकडून चौकशी केली असता, तो दुचाकी चोरून नेत असल्याचे निष्पन्न झाले. या १६ वर्षीय मुलाकडून वाहनचोरीचे चार आणि घरफोडीचा एक, असे पाच गुन्हे उघडकीस आणण्यात काळेपडळ पोलिसांना यश आले. त्याच्याकडून १ लाख ९२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला.
पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे आणि विशाल ठोंबरे हे १५ मार्च रोजी पहाटे गस्त घालत होते. पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास एक जण दुचाकी ढकलत नेताना दिसला. पोलिसांना पाहून तो पळू लागला. त्यावेळी बीट मार्शल अंमलदारांनी पाठलाग करून त्याला पकडले आणि वाहनासह पोलीस ठाण्यात आणले.
सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांनी चौकशी केली असता, तो वाहनचोरी करून दुचाकी नेत असल्याचे स्पष्ट झाले. पुढील तपासात त्याने तीन ठिकाणी वाहनचोरी केल्याचे उघडकीस आले. काळेपडळ, हडपसर, वानवडी आणि कोंढवा पोलीस ठाण्यांत वाहनचोरीचे चार गुन्हे उघडकीस आले. तसेच, काळेपडळ येथील एका घरफोडीचाही त्याने कबुली दिली.
या पाचही गुन्ह्यांमध्ये ९ हजार रुपये रोख आणि वाहने असा एकूण १ लाख ९२ हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे. चौकशीत हा अल्पवयीन मुलगा चोरी केलेली वाहने मौजमजेसाठी वापरत असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे.
ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रत्नदीप गायकवाड, अमित शेटे, पोलीस अंमलदार लक्ष्मण काळे, विशाल ठोंबरे, पंधरकर, सद्दाम तांबोळी, दाऊद सय्यद, शाहिद शेख यांनी पार पाडली.
