तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सापळा कारवाई
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : कुलमुखत्यारपत्रास आवश्यक असलेले वडिलांच्या आजारपणाचे वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी ५ हजार रुपयांची लाच घेताना तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
डॉ. उन्मेष सोपान गुट्टे (वय ५४) असे या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत एका ३५ वर्षीय नागरिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराच्या मित्र अभिषेक याच्या वडिलांसाठी कुलमुखत्यारपत्र तयार करायचे होते, त्यासाठी अभिषेक यांनी मित्र तक्रारदाराला अधिकारपत्र दिले होते.
मित्राच्या वतीने तक्रारदार रजिस्टर कार्यालयात अर्ज देण्यासाठी गेले होते. कुलमुखत्यारपत्र करण्यासाठी तक्रारदाराचा मित्र अभिषेक व त्यांचे वडील दोघेही हजर राहणे आवश्यक असल्याचे त्यांना रजिस्टर कार्यालयामधून सांगण्यात आले.
मात्र, अभिषेक यांच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाल्यामुळे ते बेडवर झोपून असून त्यांना कोणतीही हालचाल करता येत नव्हती. त्यामुळे कुलमुखत्यारपत्र बनविण्याच्या प्रक्रियेसाठी त्यांना रजिस्टर कार्यालयात हजर राहता येणार नव्हते. हे कळवल्यानंतर, अभिषेक यांच्या वडिलांच्या आजाराबाबत शासकीय वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.
यानंतर, तक्रारदार अभिषेक यांच्या वडिलांचे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळवण्यासाठी तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ. उन्मेष गुट्टे यांना भेटले. गुट्टे यांनी अभिषेक यांच्या वडिलांच्या आजाराबाबत वैद्यकीय प्रमाणपत्र देण्यासाठी तक्रारदाराकडे ५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. ही तक्रार १७ मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मिळाली.
या तक्रारीची १८ मार्च रोजी पडताळणी केली असता, डॉ. उन्मेष गुट्टे यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर तळेगाव दाभाडे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सापळा रचण्यात आला. तक्रारदाराकडून ५ हजार रुपये स्वीकारताना डॉ. गुट्टे यांना पकडण्यात आले.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक विजय पवार अधिक तपास करत आहेत.
