आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

१७ वर्षाच्या युवकाला जंगलात नेऊन नग्न करून मारहाण

Spread the love

पुणे : १७ वर्षाच्या युवकाला महादेववाडी येथील जंगलात नेऊन नग्न करून कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. हत्याराने शरीरावर ठिकठिकाणी ओरखडून जखमी केले. त्यानंतर हा प्रकार कोणाला सांगितला तर ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे.

याबाबत खडकी बाजार येथे राहणाऱ्या एका १७ वर्षीय युवकाने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी वैभव ऊर्फ पांड्या आगलावे (वय २९), यश चांदणे (वय २२) आणि काही अल्पवयीन मुलांसह ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार खडकीतील महादेववाडी येथील जंगलात १६ मार्च रोजी दुपारी २ वाजता घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी युवक हा येरवड्यातील मित्राच्या वाढदिवसाला जाण्यासाठी खडकीतील एस. व्ही. एस. गार्डन येथील बसस्टॉपवर उभा होता. त्याच्या ओळखीचा वैभव आगलावे तेथे आला. त्याने, “चल, आपण फिरून येऊ,” असे म्हणून फिर्यादीला मोटारसायकलवर बसवून महादेववाडी येथील जंगलामध्ये नेले. तेथे आधीच त्याच्या परिचयातील ८-१० मुले बसलेली होती. त्यांनी फिर्यादीला पाहून, “आता घावला, आता याला सोडायचे नाही,” असे म्हणू लागले. त्यांच्यातील काही जणांकडे धारदार शस्त्रे होती.

त्या सर्वांनी फिर्यादीला मध्ये उभे केले. वैभवने यश चांदणे याला व्हिडिओ कॉल लावला. त्यावेळी यश चांदणे सर्वांना “त्याचे कपडे काढा आणि त्याला नग्न करून फटके द्या,” असे सांगत होता. “तू अनिकेत ननवरे, निहाल गवळी यांच्यासोबत का फिरतोस? तुला मस्ती आली का? कशाला वेडेचाळे करतोस? आज दाखवतोच आम्ही कोण आहोत,” असे म्हणून त्यांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवत जबरदस्तीने त्याला नग्न केले. त्यांच्या पाठीवर, पायावर धारदार शस्त्राने ओरखडले.

तसेच, वैभव व छोटा लोहार यांनी हत्याराने मानेवर आणि शरीरावर ठिकठिकाणी ओरखडून जखमा केल्या. त्यांच्यातील एक जण त्याचा व्हिडिओ बनवत होता. सर्वांनी मिळून कमरेच्या पट्ट्याने आळीपाळीने मारहाण केली. त्यावेळी ते म्हणाले, “तुला आता समजले असेल की आम्ही कोण आहोत. तू आमच्या नादाला लागू नकोस, नाहीतर यापेक्षा वाईट परिणाम भोगावे लागतील.”

पोलिसांकडे तक्रार दिल्यास “तुला जीवाने संपवू,” अशी धमकी देऊन फिर्यादी युवकाला जखमी अवस्थेत तिथेच सोडून सर्व जण निघून गेले. त्यानंतर तो कोणालाही काही न सांगता घरी आला. दुसऱ्या दिवशी तो लंगडत चालताना पाहून त्याच्या आईने विचारणा केली. त्यावर त्याने आदल्या दिवशी घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर त्यांनी फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक दिग्जिय चौगुले अधिक तपास करत आहेत.