बेकायदेशीर गॅस रिफिलिंग करुन विकणार्यावर छापा
काळेपडळ पोलिसांनी १ लाख ३० हजार रुपयांचे गॅस सिलेंडर जप्त केले
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅस काढून तो छोट्या गॅस सिलेंडरमध्ये भरत असलेल्या पत्र्याच्या गाळ्यावर काळेपडळ पोलिसांनी छापा टाकला. गॅस भरण्याचे काम करणाऱ्या एकाला ताब्यात घेऊन तेथील ८० गॅस सिलेंडर, वजन काटा, गॅस ट्रान्सफर पाईप असा एकूण १ लाख ३० हजार ४३० रुपयांचा माल जप्त केला आहे.
निकांत राजकुमार जाधव (वय २२, रा. साईबाबा मंदिराजवळ, शोभास्पर्श अपार्टमेंट, ससाणेनगर, हडपसर) असे या आरोपीचे नाव आहे. काळेपडळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे व त्यांचे सहकारी १८ मार्च रोजी गस्त घालत असताना पोलीस अंमलदार अतुल पंधरकर यांना गोपनीय माहिती मिळाली की, माऊली गॅस एजन्सी येथील गाळ्यात एक जण घरगुती गॅसच्या टाक्यांमधून छोट्या गॅसच्या टाक्यांमध्ये गॅस भरत आहे.
या माहितीची खात्री करून पोलिसांनी हांडेवाडी रोडवरील माऊली गॅस एजन्सीवर छापा टाकला. तेथे ३० मोठ्या आणि इतर छोट्या अशा एकूण ८० गॅस सिलेंडर आढळून आले. ही जागा आरोपीने भाड्याने घेतली होती.
जागा भाड्याने घेताना त्याने घरमालकाला “मी येथे गॅस शेगडी दुरुस्तीचे काम करणार आहे,” असे सांगितले होते. जे गॅस कनेक्शन घेऊ शकत नाहीत, अशा लोकांना व विद्यार्थ्यांना तो छोट्या गॅसच्या टाक्या भाड्याने देत होता.
ही कारवाई पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे, सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, पोलीस अंमलदार प्रविण काळभोर, अतुल पंधरकर, महादेव शिंदे आणि सद्दाम तांबोळी यांनी केली.
