आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

तमाशात नाचल्याच्या रागातून दोघा तरुणांच्या खुनाचा प्रयत्न

Spread the love

पुणे : देवाच्या ऊरुसामध्ये सुरू असलेल्या तमाशामध्ये नाचत असल्याच्या रागातून पाच जणांनी दोघा तरुणांच्या डोक्यात वीट मारून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात तिसरा तरुण किरकोळ जखमी झाला आहे.

योगेश शेडगे आणि अभिजित कोंढाळकर (वय २५, रा. वडगाव पठार) असे गंभीर जखमी झालेल्यांची नावे आहेत. साहिल वशिवले हा किरकोळ जखमी झाला आहे. याप्रकरणी अभिजित कोंढाळकर यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खडकवासला पाणलोट क्षेत्रातील एनडीए बाजूच्या डोंगरालगत जांभळी हे गाव आहे. गावाचा ऊरुस असल्याने वेगवेगळ्या कारणांनी इतर ठिकाणी राहणारे गावातील नातेवाईक आणि परिसरातील लोक गावात आले होते. ऊरुसानिमित्त तमाशा ठेवण्यात आला होता, जो पहाटे सव्वा तीन वाजेपर्यंत सुरू होता.

तमाशामध्ये अभिजित कोंढाळकर यांचा मावस भाऊ योगेश शेडगे नाचत होता. याचा राग काही जणांना आला. हा राग मनात धरून पाच जणांनी अभिजित कोंढाळकर, योगेश शेडगे आणि साहिल वशिवले यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. अभिजित आणि योगेश यांच्या डोक्यात वीट मारून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला.

सध्या दोघांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी पाच जणांविरुद्ध खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक (गुन्हे) जितेंद्र कदम तपास करत आहेत.