सायबर पोलिसांनी रक्कम गोठवून संपूर्ण रक्कम परत मिळवून दिली
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : एका नामांकित कंपनीच्या अकाउंटंटला कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक असल्याचे भासवून फसवणूक करण्यात आली. भामट्याने आपण एका मिटिंगमध्ये असल्याचे सांगून, हा आपला वैयक्तिक मोबाईल नंबर असल्याचे दर्शवले. तसेच, दुसऱ्या कंपनीचे पेमेंट तात्काळ करावे लागेल, असे सांगत, व्हॉट्सअॅप मेसेजद्वारे पाठविलेल्या बँक खात्यावर ४० लाख ९० हजार ६०५ रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले.
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंपनीने तातडीने तक्रार दाखल केली, तसेच सायबर पोर्टलवरही तक्रार केली. यामुळे उत्तर प्रदेशातील बँक खात्यात जमा झालेली ही रक्कम सायबर पोलिसांनी तातडीने गोठवली. त्यानंतर १५ दिवसांत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून, कंपनीच्या खात्यात फसवणूक झालेली संपूर्ण रक्कम परत मिळवण्यात यश आले.
सायबर चोरट्याच्या सांगण्यावरून पैसे पाठवल्यानंतर अकाउंटंटने आपल्या मालकाशी संपर्क साधला. तेव्हा मालकाने आपण असे पैसे पाठविण्यास सांगितले नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, संबंधिताने तातडीने सायबर पोलिसांशी संपर्क साधून तसेच पोर्टलवर तक्रार दाखल केली.
सायबर पोलिसांनी तातडीने पत्रव्यवहार केला. हे बँक खाते उत्तर प्रदेशातील असल्याने तेथील नोडल अधिकार्यांशी संपर्क साधून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात आला. त्यामुळे फसवणूक झालेली रक्कम गोठवण्यात आली आणि चोरट्यांना ती रक्कम इतर खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्याची संधी मिळाली नाही.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त विवेक मासाळ, सहायक पोलीस आयुक्त मच्छिंद्र खाडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक तुषार भोसले, पोलीस अंमलदार नवनाथ कोडे, किरण जमदाडे, अश्विनी भोसले, ज्योती दिवाणे, माधुरी कराळे व सोनाली चव्हाण यांनी केली आहे.
सायबर फसवणूक टाळण्यासाठी खबरदारी
» अनोळखी मोबाईल नंबरवरून तुमच्या बॉस किंवा जवळच्या व्यक्तीच्या नावाने पैशांची मागणी केली गेल्यास, संबंधित व्यक्तीशी प्रत्यक्ष संपर्क साधल्याशिवाय पैसे पाठवू नयेत.
» अनोळखी मोबाईल क्रमांकावरून तुमच्या ओळखीच्या व्यक्तीचा आवाज वापरून पैशांची मागणी केल्यास, त्या व्यक्तीशी संपर्क साधल्याशिवाय पैसे पाठवू नयेत.
» अशी कोणतीही मागणी झाल्यास, संबंधित व्यक्तीच्या नेहमीच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून खात्री करून घ्यावी.
» फसवणूक झाल्यास तातडीने जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात तसेच सायबर पोर्टलवर तक्रार दाखल करावी.
