कोंढव्यातील कौसरबागेत मध्यरात्रीची घटना : दोघेही गंभीर जखमी
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
पुणे : शहरातील पार्किंगची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. केवळ दिवसा नाही, तर रात्रीही वाहने कोठे पार्क करायची, हा प्रश्न निर्माण होत आहे. या समस्येचे गंभीर रूप कोंढव्यात बुधवारी मध्यरात्री समोर आले. सार्वजनिक रस्त्यावर कार पार्किंगवरून दोन व्यक्तींमध्ये वाद झाला.
त्यानंतर, दोघांनी एकमेकांवर धारदार शस्त्राने वार करून एकमेकांना जखमी केले. या घटनेत दोघेही गंभीर जखमी झाले असून, ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
गणेश सुभाष राखपसरे (वय ३२, रा. आश्रफनगर, शेरखान चाळ, कोंढवा बुद्रुक) आणि आफाक आश्फाक शेख (वय ३०, रा. भाग्यलक्ष्मी टॉवर, मिठानगर, कोंढवा) अशी जखमींची नावे आहेत.
ही घटना कोंढव्यातील कौसरबाग येथील सना हॉस्पिटलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर, बुधवारी १९ मार्च रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश राखपसरे यांनी आपली कार कौसरबाग येथील सना हॉस्पिटलसमोरील सार्वजनिक रस्त्यावर पार्क केली होती.
त्यावरून त्यांचा आणि आफाक शेख यांचा वाद झाला. वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि दोघांनी एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ला करून परस्परांना जखमी केले. या घटनेत दोघेही जखमी झाले असून, त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दोघांनीही एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली असून, दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून रुग्णालयात उपचार पूर्ण होताच त्यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे यांनी दिली.
