लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची बारामतीत कारवाई : १ लाख घेताना पकडले
महाराष्ट्र न्युज नेटवर्क
पुणे : बारामती येथील गृहप्रकल्पाच्या प्रस्तावास मंजुरी मिळवून देण्यासाठी २ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या नगररचनाकाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून रंगेहाथ पकडले. पहिला हप्ता म्हणून १ लाख रुपये घेताना ही कारवाई करण्यात आली.
बारामती नगरपरिषदेत कार्यरत असलेल्या विकास किसनराव ढेकळे (वय ५०, रा. बारामती) या नगररचनाकाराने एका बांधकाम व्यावसायिकाकडे गृहप्रकल्प मंजुरीसाठी २ लाख रुपयांची लाच मागितली होती.
या व्यावसायिकाची एक फर्म असून त्यांनी रुई, बारामती येथे “निर्मित विहार इमारत बी विंग १” या गृहप्रकल्पाचा प्रस्ताव बारामती नगरपरिषदेत दाखल केला होता. ढेकळे यांनी मंजुरीसाठी २ लाखांची मागणी केल्याने संबंधित व्यावसायिकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे १८ मार्च रोजी तक्रार दिली.
त्यानंतर १९ मार्च रोजी पडताळणी करण्यात आली. तपासादरम्यान तडजोडीनंतर १ लाख ७५ हजार रुपयांची लाच मागण्यात येत असल्याचे निष्पन्न झाले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत तक्रारदाराला बारामतीतील ऑक्सिजन जिममध्ये पहिला हप्ता देण्यास सांगितले.
ठरल्याप्रमाणे तक्रारदाराने १ लाख रुपये दिले, त्याच क्षणी विकास ढेकळे याला रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून ढेकळे यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस निरीक्षक अमोल भोसले करत आहेत.
