आवृत्ती , पुणे
← Back to Homepage

६ लाखांच्या देशी-विदेशी दारूचा नाश

Spread the love

धाराशिव : महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत जप्त करण्यात आलेल्या ५,९८,६९९ रुपयांच्या देशी व विदेशी दारूचा नाश आंबी पोलीस ठाण्यात १९ मार्च २०२५ रोजी करण्यात आला. मुख्यमंत्री यांच्या १०० दिवसांच्या कृती आराखड्यांतर्गत कार्यालय प्रमुखांना देण्यात आलेल्या निर्देशांनुसार या मुद्देमालाची निर्गती करण्यात आली.

आंबी पोलीस ठाण्यात सन २०१२ व २०१७ मध्ये दाखल गुन्ह्यांमध्ये विविध कंपन्यांची देशी व विदेशी दारू जप्त करण्यात आली होती. महाराष्ट्र दारूबंदी कायदा या प्रकरणांमध्ये पोलिसांनी कारवाई केली होती. सदर गुन्ह्यांचा न्यायालयात निकाल लागल्यानंतर न्यायालयाने दारू मुद्देमाल नाश करण्याचे आदेश दिले.

या आदेशानुसार पोलीस अधीक्षक संजय जाधव, अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गौरीप्रसाद हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गोरक्ष खरड (आंबी पोलीस ठाणे) यांनी जिल्हाधिकारी धाराशिव आणि अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धाराशिव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करून परवानगी मिळवली.

१९ मार्च रोजी पोलीस ठाणे आंबी येथे निरीक्षक बी. बी. हूलगे (राज्य उत्पादन शुल्क, भूम) आणि दोन पंचांच्या उपस्थितीत जेसीबी मशीनच्या सहाय्याने खड्डा खोदून त्यात विविध कंपन्यांची महागडी विदेशी व देशी दारू ओतून नाश करण्यात आला. याबाबत पंचांच्या समक्ष सविस्तर पंचनामा करण्यात आला.